अशीही एक भाऊबीज….

Rate this post

अशीही एक भाऊबीज
 चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं.
” काय आहे हे?”त्याने विचारलं
“काय माहित!रजिस्टर पोस्टाने आलंय.कुणा वकिलाचं दिसतंय”
वकील म्हंटल्याबरोबर सचिनच्या पोटात खड्डा पडला.त्याने घाईघाईने पाकीट फाडून आतलं पत्र बाहेर काढलं.पत्राच्या उजव्या बाजुला वरती अँड.सुचित्रा पाटील असं लिहिलेलं होतं.खाली त्याच्या जुन्या घराचं सविस्तर वर्णन होतं आणि त्याखालचा मजकूर असा होता
“वरील मिळकत वडिलोपार्जित असून आपण वर्ष २००३ साली बनविलेल्या मुख्त्यारपत्रानुसार या मिळकतीची परस्पर विक्री केली आहे.हिंदू कौटुंबिक कायद्यानुसार आपल्या बहिणी अनिता आणि रंजना यांचा या मिळकतीवर समान हक्क असतांनाही आपण आपल्या बहिणींना विश्वासात न घेता किंवा त्यांना न कळवता या मिळकतीची विक्री करुन या विक्रीन्वये आलेली रक्कम रु.दीड कोटी परस्पर हडप  केली आहे.तरी या नोटीसीद्वारे आपणांस सुचना देण्यात येत आहे की ही नोटिस मिळाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत आमचे अशील अनिता आणि रंजना यांस प्रत्येकी रु.५० लाख देण्याची व्यवस्था करावी. अन्यथा योग्य त्या कलमांखाली,योग्य त्या न्यायालयात आपणाविरुध्द खटला दाखल करण्यात येईल आणि या खटल्याला येणाऱ्या खर्चास आपण जबाबदार असाल”
खाली वकीलाची सही होती.त्याखाली अनिता आणि रंजनाच्या सह्या होत्या.ती नोटीस वाचून सचिन एकदम खचून गेला.गेल्या सहा महिन्यांपुर्वीच तर या घराच्या कोर्टकचेऱ्यातून त्याला मुक्तता मिळाली होती.परत एकदा कोर्टकचेरीच्या कल्पनेने त्याच्या अंगावर काटा उभा राहिला.तो मटकन खुर्चीत बसला.त्याचा चेहरा पांढराफटक पडलेला पाहून सुचिता लगबगीने त्याच्यासाठी पाणी घेऊन आली.त्याच्या हातात पाण्याचा ग्लास देऊन तिने विचारलं
“का काय झालं?काय आहे त्या पत्रात?”
“रंजू आणि अनुने नोटीस पाठवलीये आपल्याला.आपण जे घर विकलं त्यात दोघी हिस्सा मागताहेत”
“काय्य?पण तुम्ही तर त्यांना वीस वीस लाख द्यायला कबुल केलं होतं ना?”
“हो केलं होतं पण त्यांना समान हिस्सा म्हणजे पन्नास लाख हवे आहेत”
“अस्सं.म्हणजे तुम्ही पंधरा वर्षं कोर्टात लढलात.ते घर वाचवण्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं.केस लढण्यासाठी पदरचे पाच सहा लाख खर्च केले.वकीलामागे फिरण्यात आणि कोर्टाच्या चकरा मारण्यात तुमचं पुर्ण तारुण्य तुम्ही वाया घालवलंत त्याचं काय?”
सचिनकडे बोलायला शब्दच नव्हते.सुचिता म्हणत होती त्यातला एकूण एक शब्द खरा होता.
“आणि तुमच्या बहिणींसाठी तुम्ही काय नाही हो केलं? आईवडिलांच्या पश्चात त्यांना वाढवलं,शिकवलं,मोठं केलं.त्यांची लग्नं चांगल्या घरात लावून दिलीत.आईवडिल काय करतील इतकं तुम्ही केलंत त्यांच्यासाठी.त्याचे असे उपकार फेडताहेत त्या?कोर्टात जाताहेत म्हणे!येऊच दे त्यांना दिवाळीत.चांगला जाब विचारणार आहे मी त्यांना”
संतापाने ती बराचवेळ बडबडत राहिली.असह्य होत असूनही सचिन ते मुकाट्याने ऐकत राहिला.
   
सचिनच्या वडिलांचं वडिलोपार्जित घर शहराच्या अगदी मध्यवस्तीत होतं.कालांतराने आजुबाजुला बकाल वस्ती वाढू लागली.देशीदारुची दुकानं आली.ते पाहून त्याच्या वडिलांनी आपल्या मुलांवर वाईट संस्कार होऊ नयेत यासाठी स्वतःचं घर सोडून शहराबाहेरच्या वस्तीत भाड्याने घर घेतलं.मध्यवस्तीतलं घर त्यांच्याच एका व्यापारी मित्राला भाड्याने दिलं.मित्रच तो,त्यातून शब्दाला जागण्याचा तो काळ होता.त्यामुळे लेखी करार करण्याची गरज कुणालाच भासली नाही.वर्षामागून वर्ष उलटत गेली.सगळं व्यवस्थित सुरु असतांना एका आजाराचं निमित्त होऊन सचिनचे वडील वारले.त्यावेळी सचिन फक्त पंधरा वर्षाचा होता.घरी कमावणारं कुणी नाही.परीस्थीती पाहून वडिलांच्या मित्राने घराचं भाडं तर वाढवून तर दिलंच शिवाय सचिनला आपल्या डाळ मिल मध्ये कामगाराची नोकरीही दिली.सचिनचं घर अडचणीत का होईना सुरळीत चालू झालं.मात्र वडिलांना वारुन एक वर्ष होत नाही तर वडिलांच्या म्रुत्युमुळे खचलेली आईही देवाघरी गेली.१६ वर्षांच्या सचिनवर १३ वर्षाच्या रंजनाची आणि ११ वर्षाच्या अनिताची जबाबदारी येऊन पडली.वडील वारल्यामुळे आधीच मोठा झालेला सचिन आईच्या निधनामुळे एकदम प्रौढ झाला.वयाच्या मानाने तो जास्तच समजुतदार होता.आपल्या लहान बहिणींवर त्याने उत्तम संस्कार केले.त्यांना स्वयंपाक करणं शिकवलं.त्याच्यासाठी बहिणी आणि बहिणींसाठी तो सर्वस्व होता.नोकरी करताकरता त्याने आपलं शिक्षणही सुरु ठेवलं होतं.तो ग्रँज्युएट झाला आणि वडिलांचे मित्र वारले.सचिनचा एक मोठा आधार गेला.डाळ मिलचा कारभार वडिलांच्या मित्राच्या तरुण मुलांकडे गेला आणि सचिनच्या हाल अपेष्टांना सुरुवात झाली.नवीन मालकांना अनुभव नव्हता त्याचबरोबर माणुसकीही नव्हती.कामगारांना पगार तर वेळेवर मिळतच नव्हता पण सचिनला  त्याचं हक्काचं घराचं भाडंही तीनतीन महिने मिळेनासं झालं.घरात खायची मारामार व्हायला लागली तशी मोठ्या रंजनाने लोकांची धुणीभांडी करायची तयारी दाखवली पण स्वाभिमानी सचिनला बहिणींनी असं लाजीरवाणं काम केलेलं सहन होणं शक्यच नव्हतं.म्हणून फँक्टरीतून आला की तो एका झेराँक्स दुकानावर जाऊ लागला.इकडे फँक्टरीत नवीन मालकांची अरेरावी आणि छळ वाढला.एकदा तर सहा महिने उलटून गेले तरी सचिनला त्यांनी घराचं भाडं दिलं नाही.तीन महिन्यापासून पगारही नव्हता.हवालदिल झालेला सचिन मालकाला जाऊन भेटला.भाडं आणि पगार द्यायची कळकळीची विनंती केली.मालकाने नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरं दिली.बिथरलेला सचिन बोलून बसला
“भाडं देणं जमत नसेल तर खाली तरी करुन द्या घर.मला दुसऱ्याला तरी भाड्याने देता येईल” ते ऐकून तरुण मालक संतापला आणि म्हणाला
“नाही सोडत घर.जा तुला काय करायचं ते करुन घे.आणि उद्यापासून फँक्टरीतही येऊ नकोस.मी आतापासूनच तुला फँक्टरीतून काढतोय”
ते ऐकून सचिनचे हातापायातलं त्राण गेलं.गयावया करत तो म्हणाला.
“शेठजी नाही भाडं तर पगार तरी द्या.फार अडचण चालू आहे सध्या”
“तुला एकदा सागितलेलं कळत नाही का?सिक्युरिटी याला बाहेर हाकलून द्या”
म्हणतात ना संकटं आली की गठ्ठ्याने येतात.सचिन ज्या झेराँक्स दुकानात काम करत होता तेही बंद पडलं.सचिन रस्त्यावर आला.भीक मागण्याशिवाय त्याला पर्याय उरला नाही.महिनाभर नोकरीच्या शोधात तो  वणवण फिरला.शेवटी एका मित्राच्या ओळखीने एका रस्ते बनवणाऱ्या काँन्ट्रक्टरकडे त्याला मजुरीचं काम मिळालं.काही महिने त्याने तिथे काम केलं.पण सचिनसारख्या सभ्य सुशिक्षित मुलाने असं मजुराचं काम करावं हे काँन्ट्रक्टरला पटेना.त्याने त्याला एका खाजगी पतपेढीत कारकुनाची नोकरी मिळवून दिली.इथेही पगार कमीच होता पण नियमित होता.शिवाय पिळवणूक नव्हती.थोड्याच दिवसात तो मँनेजर झाला.आता त्याला ते बंद पडलेलं झेराँक्स दुकान खुणावू लागलं.एक दिवस हिंमत करुन त्याने ते भाड्याने घेतलं.पतपेढीतून कर्ज घेऊन जुन्या झेराँक्स मशीन्स काढून नवीन आधुनिक मशीन्स आणल्या.काँलेजसमोरच दुकान असल्याने ते उत्तम चालू लागलं.सचिनने मग त्या दुकानात अनेक जोडधंदे सुरु केले.आता नोकरीपेक्षाही चांगलं उत्पन्न मिळू लागलं.म्हणून सचिनने नोकरी सोडली.पगारातून बचत केलेल्या पैशातून त्याने ते दुकानच विकत घेऊन टाकलं.म्हणता म्हणता सचिनची शहरात दोन झेराँक्सची दुकानं झाली.
 आता त्याच्या जुन्या घराकडे लक्ष देणं गरजेचं होतं.दोन वर्षांपासून भाडं येणं बंद होतं.सचिनने त्याच्या एका मित्राला सल्ला विचारला.मित्र त्याला वकीलाकडे घेऊन गेला.वकीलाने सगळा इतिहास शांततेने ऐकून घेतला आणि म्हणाला
“तुम्ही काही काळजी करु नका.आपण त्यांना नोटिस पाठवू.नोटिस पाहिल्याबरोबर ते घराची चावी घेऊनच धावत येतील आणि समजा नाही आले तर आपण सरळ दावा ठोकू.कसे देत नाही घर पहातोच मी!कोर्टाचं समन्स आलं की मोठमोठे गुन्हेगार घाबरुन जातात.हे तर काय व्यापारी आहेत.लक्षात ठेवा कोणताही व्यापारी सहसा कोर्ट कचेऱ्या टाळतो”
सचिनला आनंद झाला.ते घर हातात आलं की ते विकून सचिनला स्वतःचं घर घेता आलं असतं.रंजना आणि अनिता आता लग्नाच्या झाल्या होत्या.त्यांच्या लग्नाला तो पैसा कामाला आला असता.
पण वकीलाने लावलेल्या आशा किती फुसक्या होत्या हे सचिनला लवकरच अनुभवाला आलं.समोरची पार्टी नोटिसीला घाबरली तर नाहिच उलट “ते घर आमचंच आहे.सचिनच्या वडिलांनी ते आम्हांला अनिश्चित काळाकरता  बक्षीस म्हणून दिलं होतं.सचिन मराठे हे आमची नाहक बदनामी करत आहेत.त्यांनी या नोटिसीबद्दल आमची माफी मागावी अन्यथा त्यांचेविरुध्द अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल”अशी धमकी दिली .वकिलांनी सचिनला करारनामा आणि भाड्याच्या पावत्यांबद्दल विचारलं.सचिनजवळ ते असण्याचा प्रश्नच नव्हता.वकीलांना तेच तर हवं होतं.त्यांनी सचिनलाच दोष दिला.दावा दाखल केल्याशिवाय इलाज नाही अशी सचिनची खात्री करुन दिली. शेवटी कोर्टात केस दाखल झाली आणि सुरु झाली एक अंतहीन लढाई!ही केस सचिन हारणार  हे वकिलांना माहित होतं पण असं सांगून त्यांचा व्यवसाय कसा चालणार होता?तारखांवर तारखा पडू लागल्या.प्रत्येक तारखेला वकील त्याच्याकडून पैसे घ्यायचे.समोरच्या पार्टीला तर केस जाणूनबुजून  लांबवायचीच होती.वर्ष झालं तरी काहीच हालचाल दिसेना.एका मित्राने सचिनला वकील बदलायचा सल्ला दिला.हो नाही करत सचिनने तो अमलात आणला.आता तारखांवर काहीतरी कामकाज होऊ लागलं.आश्चर्य म्हणजे पाच वर्षांनी सचिनच्या बाजूने निकाल लागला.त्याच दरम्यान रंजनाचं लग्न ठरलं.सचिनला खुप आनंद झाला.सुखाचे दिवस आले असं त्याला वाटू लागलं.रंजनाचं लग्न होत नाही तर समोरच्या पार्टीने जिल्हा न्यायालयात निर्णयाविरुद्ध अपिल केलं.पुन्हा तारखांवर तारखा पडू लागल्या.वकिलामागे फिरणं सुरु झालं.दरम्यान अनिताचंही लग्न रंजनाच्याच दिराशी झालं.दोघी बहिणी एकमेकींच्या जावा झाल्या.
जिल्हा न्यायालयातला खटला चार वर्षं चालला.दुर्दैवाने सचिन त्यात हरला.सचिनने आता वयाची तिशी गाठली होती.बहिणी आणि नातेवाईकांच्या आग्रहास्तव त्याने लग्न केलं.पण खटला हरल्याची बोच त्याला लागून हरली होती.एका हुशार पण महागड्या वकीलाशी सल्लामसलत करुन त्याने हायकोर्टात अपील दाखल केलं.पुन्हा एकदा कोर्टात चकरा सुरु झाल्या.मात्र आता कामधाम सोडून मुंबईला जावं लागत होतं.सचिनला आता या कोर्टकचेरीचा कंटाळा येऊ लागला होता.पण वडिलोपार्जित घर दुसऱ्यांनी जबरदस्तीने बळकावून बसावं हेही त्याला सहन होत नव्हतं.हायकोर्टात खटला सहा वर्ष चालला.यावेळी मात्र सचिनच्या बाजूने निकाल लागला.सुदैवाने समोरच्या पार्टीने दिलेल्या मुदतीत सुप्रीम कोर्टात अपील न केल्याने सचिनला घराचा ताबा मिळाला.घराची अवस्था अतिशय वाईट होती.आजुबाजुला दुकानं झालेली असल्याने त्या जागेवर घर बांधण्यात अर्थ नव्हता.सचिनने एका बिल्डरला गाठलं.घराच्या अनेक भानगडी असल्यामुळे बिल्डर त्या जागेचे त्याला फक्त दिड कोटी द्यायला तयार झाला.जागेचं महत्व आणि क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने ते कमीच असले तरी कोर्टकचेऱ्यांनी थकलेला सचिन दिड कोटीसाठी तयार झाला.बहिणींना कोर्टात यावं लागू नये म्हणून केलेल्या मुखत्यारपत्राच्या आधारे त्याने घराची विक्री केली मात्र त्याने बहिणींना ग्रुहित धरण्याची फार मोठी चुक केली होती.बहिणींना फोन करुन त्याने या विक्रीची माहिती दिली आणि प्रत्येकीला वीस वीस लाख देण्याचं कबुलही केलं.रंजना आणि अनिताला यात काही वावगं दिसलं नाही.ही गोष्ट त्यांनी आपल्या घरात सांगितली. नवऱ्यांना आनंद झाला पण लालची सासू मात्र  भडकली.त्यात या सौद्याची खबर रंजना आणि अनिताच्या वकील मैत्रिणीला लागली.तिने रंजनाला फोन केला
” रंजू तुमचं जुनं घर फक्त दिड कोटीत विकलं गेलं म्हणे!”
“फक्त?म्हणजे..?
” अगं वेडे एका ब्रोकरने मला सांगितलं की त्या ठिकाणी भाव जास्त आहेत आणि कमीतकमी तीन कोटीत तरी ते घर विकल्या गेलं असेल.याचा अर्थ एकतर तुमच्या भावाला फसवलं गेलं असेल किंवा तुमचा भाऊ तरी तुम्हांला फसवत असेल.मला तरी दुसरी शक्यता जास्त वाटतेय.कारण माझ्या बाबतीत तेच घडलंय.माझ्या भावांनी घराचे वाटेहिस्से केले पण मला एक रुपयासुध्दा दिला नव्हता.त्यावेळी मी लहान होते मला काही कळत नव्हतं.त्यांनी सांगितलं त्या कागदावर सह्या केल्या.तुमचं तर काय!मुख्त्यार पत्रात तुम्ही खरेदीविक्रीचे सर्व अधिकार भावालाच देऊन टाकले.त्याचा त्याने फायदा करुन घेतला.”
“नाही गं!दादा असं काही करणार नाही.आणि तो वीस लाख द्यायला तयार आहे ना!”
” वीस लाख देतोय मग पन्नास लाख का नाही?वडिलांच्या प्राँपर्टीवर मुलींचा समान हक्क असतो.याचा अर्थ तुम्हांला पन्नास लाख मिळायला हवेत की नको?”
“तुझं म्हणणं ठिक आहे.पण आम्ही दोघी समाधानी आहोत वीस लाखांवर”
” शहाण्या व्हा रंजू.मी खात्रीने सांगते सचिनने ते घर तीन कोटीला विकलं असेल आणि तुम्हांला जास्त पैसे द्यायला नको म्हणून दिड कोटी सांगतोय.शिवाय तुमचे हक्काचे तीस लाखही तोच लाटतोय.बघा बाई विचार करा आणि मला सांगा.मी तुमच्या हक्कासाठी लढायला तयार आहे”असं म्हणून तिने फोन ठेवून दिला.
रंजनाची सासू तिथेच उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत होती.ती म्हणाली.
“तुझी मैत्रिण बरोबर म्हणतेय.सचिनकडून तुम्ही पन्नास पन्नास लाख घ्यायलाच पाहिजेत”
रंजनाने ही गोष्ट अनिताला सांगितली.तिचाही सचूदादा आपल्याला फसवेल यावर विश्वास बसला नाही.पण त्याने पन्नास लाख द्यायला हरकत नाही हे तिलाही पटलं.संशय आणि अविश्वासाचं बीज पेरल्या गेलं होतं.दोघींनी विचारविनिमय करुन आपल्या वकील मैत्रीणीकडे जायचं ठरवलं.
दोन दिवसांनी त्या मैत्रिणीकडे गेल्या.तिच्याकडे असलेल्या पक्षकारांच्या गर्दिकडे पाहून ती यशस्वी वकील असल्याची त्यांना खात्री पटली.
“तुम्हाला सांगते रंजू आणि अनू,आपल्या भारतातल्या साठ सत्तर टक्के मुलींना वडिलांच्या संपत्तीत आपला हिस्सा आहे हे माहितच नसतं.उरलेल्यांपैकी बऱ्याच जणी भावावरच्या प्रेमापोटी आपला हक्क सोडून देतात.बाकीच्यांवर जबरदस्ती केल्या जाते किंवा मग माझ्यासारखं फसवून सह्या घेतल्या जातात.तुमच्या बाबतीतही थोडंफार असंच झालंय.तुमचा भाऊ तुम्हांला फसवतोय”
“पण मग आता काय करायचं?आम्ही दादाशी भांडायचं का?”अनिताने विचारलं
” नाही.भांडून आपली एनर्जी कशाला वाया घालवायची?त्यापेक्षा आपण त्याला सरळ नोटीस पाठवू.नोटीस पाहिल्याबरोबर तो ताबडतोब पन्नास लाख आणून देईल”
“आणि तसं नाही झालं तर?”रंजनाने शंका विचारली.
“असं शक्यतो होणार नाही.कायद्याची जाण त्यालाही असेल.तुमचा हक्क तो नाकारु शकत नाही.आणि समजा तसं झालं नाहीच तर आपण सरळ कोर्टात केस टाकू”
“नको कोर्टात नको.”अनिता घाबरुन म्हणाली”बिचारा गेली पंधरा वर्ष कोर्टकचेरीचा सामना करतोय”
“हेच तर चुकतं आपलं!हे पुरुष बिचारे वगैरे काही नसतात.महास्वार्थी आणि जहांबाज असतात.आपल्याला इमोशनली ब्लँकमेल करुन त्यांचा स्वार्थ साधून घेतात.काय करायचं मग? पाठवायची का नोटीस?”
दोघींनी घाबरुन एकमेकींकडे पाहिलं.
” घरी विचारुन सांगायचं का?”रंजनाने अनिताला कुजबुजत्या स्वरात विचारलं.पण दोघींचाही निर्णय होईना
“अगं एवढ्या काय घाबरताय?”वकिल मैत्रीण मध्येच म्हणाली” आपण असं करु.नोटीस पाठवू.परीणाम झाला तर आनंदच आहे.नाही तर पुढे कोर्टात जायचं की नाही हे नंतर तुम्हांला ठरवता येईल.शेवटी फायदा तुमचाच आहे तेव्हा निर्णय तुम्हांलाच घ्यावा लागणार आहे”
दोघींच्या चेहऱ्यावरची चिंता कमी झाली.
“ठिक आहे.नोटीस पाठवू आपण”रंजना म्हणाली.
वकील मैत्रीणीने तयार केलेल्या नोटिसीवर दोघींनी सह्या केल्या खरं पण दोघींची मनं जड होऊन गेली होती.नोटिसीचे एक हजार रुपये देऊन त्या घरी आल्या.सासू त्यांची वाटच बघत होती.सचिनला नोटीस पाठवल्याचं कळल्यावर तिचा चेहरा आनंदाने फुलला.रुममध्ये आल्यावर रंजना अनिताला म्हणाली.
“अनू मला सारखं वाटतंय की आपलं काहीतरी चुकतंय”
“हो गं!मलाही तसंच वाटतंय.आपला दादा तसा नाहिये.आपल्याला फसवणार नाही तो”
तिने असं म्हंटल्याबरोबर रंजनाचे डोळे भरुन आले.
“खुप काही केलंय गं त्याने आपल्यासाठी”
“हो खरंय.पण जाऊ दे रडू नकोस.तो देईल तेवढे पैसे घेऊन आपण शांत रहायचं. कोर्टात काही जायचं नाही”
ते ऐकल्यावर रंजना जरा शांत झाली.
“नोटीस मिळाल्यावर तो दिवाळीला बोलावेल का गं आपल्याला?”
“तो बोलावेल पण वहिनी त्याला तसं करु देणार नाही”
“मग आपल्या मुलांचं काय करायचं?मामाकडे जायचं म्हणून आतापासून नाचताहेत ती!तुला तर माहित आहे सचुमामा त्यांचा किती आवडता आहे तो”
अनिताला काय बोलावं ते सुचेना. ती एवढंच म्हणाली
“अजून दिवाळीला पंधरा दिवस आहेत.तोपर्यंत निघेल काहीतरी मार्ग”
दोघींच्या नवऱ्यांना नोटिसीची बातमी कळली.दोघांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या.तसे ते स्वभावाने चांगले होते.दोघांना चांगल्या नोकऱ्या होत्या.उत्तम पगार होते.पैशाची कसलीही कमतरता नव्हती.पण आयता पैसा मिळाला तर कुणाला नको असतो? तोही पन्नास लाख!रंजनाच्या नवऱ्याने लगेच ब्रोकरला फोन करुन लोणावळ्याला फार्महाऊस बघायला सांगितलं. अनिताच्या नवऱ्याने पुण्याला नवीन फ्लँटची चौकशी सुरु केली.दोघींच्या सासुला मात्र या एक कोटी रुपयाचं काय करावं ते सुचेना.तिने आपल्या लेकीला, मीनलला फोन लावला.मीनल गावातच रहात होती आणि रंजना,अनिताची बालपणीची मैत्रीण होती.विशेष म्हणजे दोघींची लग्नं तिनेच जुळवली होती.आईने फोनवरुन सचिनची बातमी दिल्यावर ती स्तब्ध झाली.”या एक कोटी रुपयाचं काय करायचं हे ठरवायला मी संध्याकाळी घरी येते”असं म्हणून तिने फोन ठेवला.
संध्याकाळी ती माहेरी गेली तेव्हा तिचे दोन्ही भाऊ घरी आले होते.रंजना आणि अनिता किचनमध्ये काहीतरी करत होत्या.
” बरं झालं बाई तू आलीस.एवढ्या एक कोटीचं काय करायचं तेच मला सुचत नाहिये” मीनलची आई उर्फ रंजनाची सासू तिला म्हणाली
“आई रंजना आणि अनिता कुठे आहेत?त्यांना बोलव बरं.मला त्यांच्याशी बोलायचंय”
“अगं त्यांना कशाला बोलवतेस?आपण आपलं ठरवू ना”
“नाही आई.पैसे आपल्याला नाही,त्यांना मिळणार आहेत.मग त्यांच्याशी बोलायला नको?अगोदर मला त्यांच्याशी बोलू दे.मग मी तुम्हा सर्वांशी बोलते”
तेवढ्यात त्यांचं बोलणं ऐकून रंजना आणि अनिताच बाहेर आल्या.
“रंजू,अनू आई सांगत होती की तुम्ही सचिन दादाला वकीलामार्फत नोटिस पाठवली म्हणे!”
“हो का?”रंजूने विचारलं
“फार अन्याय केला तुमच्यावर सचिनदादाने नाही?तुम्ही दोघी इतक्या गरीब आहात की तुमचे खायचे वांधे झालेत.त्यामुळे तो देत असलेले वीस लाखही तुम्हाला कमी पडलेत”
तिच्या त्या उपरोधीक बोलण्यावर दोघींनी चमकून तिच्याकडे पाहिलं
“असं का म्हणते मीनू?आमचा तो हक्कच आहे”अनू म्हणाली
“अनू कुणाला हक्क मागताय तुम्ही?ज्याने १५-१६ वयाचा असल्यापासून तुमची जबाबदारी स्विकारली, कुठे कुठे मजुरी करुन,स्वतः हाल अपेष्टा सोसून ज्याने तुमच्या सर्व हौशी पुरवल्या,ज्याने तुमचा आईवडिल होऊन सांभाळ केला,तुम्ही लहान असतांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करुन तुम्हांला भरवलं,ज्याने तुमची आजारपणं सोसली त्याला तुम्ही हक्क मागताय?काय नाही केलं त्याने तुमच्यासाठी?तुम्हांला शिकवलं,मोठं केलं,स्वतःच्या वाढत्या वयाचा विचार न करता तुमची लग्नं लावून दिली.ज्या घराचा ताबा मिळवण्यासाठी त्याने पंधरा वर्ष रक्ताचं पाणी केलं त्या घरावर तुम्ही हक्क सांगताय?सांगा काय केलंत तुम्ही त्या घरासाठी?कधी तुम्ही म्हंटलंत की दादा तू राहू दे आम्ही जातो कोर्टात?किंवा वकीलाला पैसे तू देऊ नको आम्ही देतो असं म्हंटलं?कधी म्हंटलंत की खटल्याचं टेन्शन तू घेऊ नको आम्ही घेतो?सांगा ना?तुम्ही काय सांगणार म्हणा कारण तुम्ही काहीच केलं नाही त्या घरासाठी.आणि आता आयत्या पीठावर रेघोट्या  ओढताय.सचिनदादा तुम्हांला प्रेमाने वीस लाख देतोय तेसुध्दा तुम्हांला कमी पडायला लागले नाही का?”
तिच्या या उत्तेजित आवाजाने रंजना,अनिताचे नवरेही बाहेर आले.
“मीनू हे काय बोलतेय तू?मी तुला कशासाठी बोलवलंय आणि तू उलटंच काहीतरी बरळतेय.आणि तुला माहित नसेल आजकाल कायदाच असा आहे की मुलींना वडिलांच्या प्राँपर्टीत हिस्सा मिळालाच पाहिजे” तिची आई रागाने म्हणाली
“बरं झालं आई तू मला कायदा सांगितला.हा बंगला माझ्या वडिलांचं वडिलोपार्जित घर पाडून तुम्ही बांधलाय.ज्यावेळी तुम्ही ते घर पाडलं त्यावेळी या घराची किंमत तीन कोटी  होती.याचाच अर्थ असा की मला माझा एक कोटीचा हिस्सा मिळायला हवा.” मग भावांकडे वळून ती म्हणाली “दिले तुम्ही मला एक कोटी रुपये?चला हरकत नाही आता द्या मला एक कोटी रुपये”
तिच्या या पवित्र्याने तिची आई आणि भाऊ अवाक झाले.रंजना आणि अनिताही तिच्याकडे आश्चर्यचकीत होऊन पाहू लागल्या.हा विचार त्यांच्याही मनात आजपर्यंत आला नव्हता.
“अग पण मिनू आम्ही अजून या घरात रहातोय.घर विकलं की देऊ तुला तुझा हिस्सा”रंजनाचा नवरा तिला समजावत म्हणाला
“ठिक आहे.माझ्या हिश्श्याच्या जमीनीवर तुम्ही माझी परवानगी न घेता घर बांधलं.शिवाय त्याचं भाडंही तुम्ही मला देत नाही .याचा अर्थ तुम्ही माझी जमीन बळकावली आहे.तुमच्यावर फौजदारी खटला दाखल करुन तुम्हांला जेलमध्ये टाकते की नाही बघाच” मीनल रागाने म्हणाली.
“काय माझा हिस्सा माझा हिस्सा लावलंय मिनू?तुला काय कमी आहे?गाडी बंगला सगळंच तर आहे तुझ्याकडे!”अनिताचा नवरा म्हणाला
“बघितलं रंजू आणि अनू!या माझ्या भावांनी माझ्यासाठी कधीच काही केलं नाही.हे घरही त्यांना आयतं मिळालंय.तुमच्या भावासारख्या कोर्टाच्या वाऱ्या नाही कराव्या लागल्या त्यांना.तरीसुध्दा माझा हिस्सा देण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही.आताही ते टाळाटाळ करताहेत .हा खरा अन्याय आहे.मी तुमच्या पाया पडते.सचिनदादावरची नोटीस मागे घ्या.तो देत असलेले वीस लाखही घेऊ नका.खुप सोसलंय त्याने.आता सुखाचे दिवस आले तर त्याला त्रास देऊ नका.आणि आई मला तुमचं काहीही नको.पण तू आणि तुझ्या मुलांनी तुझ्या सुनांच्या पैशावर डोळा ठेवणं बंद करावं.लक्षात ठेवा तुम्ही जर त्यांना याबद्दल म्हंटलंत तर मी सुद्धा माझ्या हिश्श्यासाठी कोर्टात जायला कमी करणार नाही.चला येते मी”
रंजना ,अनिताचे डोळे भरुन आले होते.नणदेकडे पहात रंजना म्हणाली
“खुप मोठं मनावरचं ओझं उतरवलसं तू मिनल”
दोघा बहिणींना जवळ घेऊन म्हणाली
“अगं वेड्यांनो सचिनदादा तुमचाच नाही माझासुध्दा भाऊ आहे.लाखात एक भाऊ आहे आपला.त्याला अंतर देऊ नका”
रंजना आणि अनिताने पाठवलेली नोटीस घेऊन सचिन वकिलाच्या केबिनमध्ये शिरला.ती नोटीस वाचून वकील म्हणाले
“आपण या नोटिसीला उत्तर देऊ.तुम्ही आजपर्यंत बहिणींसाठी आणि या घराचा ताबा मिळवण्यासाठी काय काय केलं त्याचा उल्लेख करु.भावनात्मक आवाहन केलं की बहिणी भावनावश होऊन तुमच्यावर केस करणार नाहीत असं मला वाटतं.तरीही त्यांनी केस केली तर आपल्याला काही पर्याय रहाणार नाही”
“वकीलसाहेब बहिणींसाठी आणि घरासाठी मी जे काही केलं ते माझं कर्तव्यच होतं.आणि तुम्हाला खरं सांगू या कोर्टकचेऱ्यांनी मी थकून गेलोय.त्यातून बहिणींशी मी लढू शकत नाही.माझं फार प्रेम आहे हो त्यांच्यावर.तुम्हाला जे उत्तर पाठवायचं आहे ते पाठवा.या भाऊबीजेला मी त्यांना पन्नास पन्नास लाखाचे चेक देऊन मोकळा होणार आहे”
“अहो इतकी घाई काय करताय?बघुया ना तुमच्या बहिणींमध्ये किती शक्ती आणि धाडस आहे खटले चालवायचं!काही वर्षानंतर त्यांनाच कंटाळा येईल आणि करतील काँप्रमाईज”
“पण तोपर्यंत आमचे संबंध तुटतील त्याचं काय?”
“हा विचार तुमच्या बहिणींनी करायला नको का?”
“त्या लहान आहेत वकीलसाहेब,त्यातून सासरचंही प्रेशर असणारच त्यांच्यावर. नकोच ते.त्यापेक्षा पन्नास लाख देणं योग्य राहील असं मला वाटतं”
वकीलाने खांदे उडवले
” जशी तुमची मर्जी”
सचिन जसा बाहेर पडला.वकिलाने रंजनाच्या वकीलाला फोन लावला
“मँडम तुमचा प्लँन फेल झाला.आमच्या अशीलाने माघार घेतली.तुमच्या अशीलांना पन्नास लाख द्यायला तो तयार झाला”
“अरे राम काय माणूस आहे!वाटलं होतं चांगली ८-१० वर्ष केस चालेल.शेवटी काँप्रमाईज होईल तोपर्यंत आपली कमाई होत राहील.फारच कमजोर निघाला हो तुमचा पक्षकार”
“जाऊ द्या आता नोटिसीच्या फीमध्येच समाधान माना”वकील हसुन म्हणाले.
    दिवाळी आटोपली.आज भाऊबीजेचा दिवस.अनिता,रंजनाला अपेक्षा नसतांनाही दिवाळी सुरु होण्यापुर्वीच सचिनने आपल्या बहिणी आणि मेव्हण्यांना फोनवर रितसर आमंत्रण दिलं होतं.आज सकाळपासून तो त्यांची वाटच पहात होता.गाड्या थांबल्याचा आवाज आला तसा तो शर्ट घालून बाहेर आला.घरात शिरल्याबरोबर रंजना आणि अनिताची मुलं लाडक्या सचिनमामाला बिलगली.सगळी सोफ्यावर बसल्यावर सुचिताने सगळ्यांना पाणी आणलं.ते पिऊन झाल्यावर रंजनाने अनिताला इशारा केला.अनिताने पर्समधून एक पाकीट काढलं.
“सचूदादा हे घे”
ते पाकीट पाहून सचिनच्या ह्रदयात धस्स झाल.सुचिताच्या हातातला ग्लासांचा ट्रे थरथरला.
” काय आहे त्यात?”कापऱ्या स्वरात त्याने विचारलं.
“वाच ना.कळेलच तुला”रंजना म्हणाली
थरथरत्या हाताने त्याने त्या पाकीटातून कागद बाहेर काढला.फक्त दहा पंधरा ओळीची ती नोटीस होती.त्यात लिहिलं होतं
 “या नोटीसीद्वारे आपणांस कळविण्यात येते की यापुर्वी पाठवलेली नोटीस रद्दबातल समजावी.तसेच आम्ही,खालील सही करणार, खालील उल्लेख केलेल्या वडिलोपार्जित मिळकतीवरील आमचा हक्क स्वखुशीने,कोणत्याही दडपणाखाली न येता सोडून देत आहोत.तसेच या मिळकतीच्या विक्रीपोटी मिळालेल्या रकमेतील आमचा हिस्साही आम्ही आमच्या भावाकरीता राजीखुशीने सोडून देत आहोत.यापुढे आमची त्याबद्दल कोणतीही तक्रार रहाणार नाही”
बाकी खाली बराच मजकूर होता पण डोळे भरुन आल्यामुळें सचिनला ते दिसेनासं झालं.पत्र बाजुला करुन त्याने बहिणींकडे पाहिलं.त्याचे भरलेले डोळे पाहून रंजनाला रहावलं नाही.तिने उठून भावाला मिठी मारली.पाठोपाठ अनिताही उठून भावाला बिलगली.दोघीही बहिणी हमसून हमसून रडू लागल्या सचिनच्या डोळ्यातूनही घळाघळा अश्रू वहात होते.अखेर प्रेम जिंकलं होतं.व्यवहार आणि कायद्याची हार झाली होती.सचिनला तसं रडतांना पाहून अनिताची चार वर्षाची मुलगी मामाच्या पायाला बिलगली आणि मुसमुसत रडू लागली.तिच्या बालमिठीच्या स्पर्शाने भानावर येऊन सचिनने तिला वर उचलून घेतलं.तिनेही लगेच त्याच्या गळ्याला घट्ट मिठी मारली.
संध्याकाळी दोघी बहिणींनी भावाला ओवाळल्यावर सचिनने दोघींच्या तबकात दोन दोन चेक टाकले
” यात एक पन्नास लाखाचा आणि एक वीस लाखाचा चेक आहे.तुम्हाला जो हवा असेल तो घ्या”
रंजनाने चारही चेक हातात घेऊन त्याचे तुकडे केले आणि ते डस्टबीनमध्ये टाकून दिले.
“बस हं दादा आता परत आम्हांला रडवू नकोस.आम्हांला फक्त तू आणि तुझं प्रेम हवंय”
“अगं भाऊबीजेला मी तुम्हांला काही देण्याऐवजी तुम्हीच मला बहिण बीज दिलीये”
“नाही दादा.तू आमच्यासाठी जे केलंय त्याची भरपाई सात जन्मात होणार नाही.आमचं चुकलं आम्हाला माफ कर”
दीपक तांबोळी
   9503011250
(ही कथा माझ्या ” हा खेळ भावनांचा ” या पुस्तकातील आहे.नावासहित शेअर करायला हरकत नाही.माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी क्रुपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा)

Leave a Comment