“उदंड जाहलें व्यंकू”

Rate this post

 “उदंड जाहलें व्यंकू”

“७२ तासांसाठी प्रति व्यक्ती ८० हजार ते दोन लाख रूपयांपर्यंची पॅकेजेस” हे आपण वाचतो, तेव्हाच हे अगदी सहज समजतं की, हे तीन दिवस इथं बरंच काही वेगळंच चालणार आहे. आणि १८०० मुलंमुली हे पैसे भरून प्रवेश निश्चित करतात, तेव्हा हेही समजून घेण्यासारखं आहे की, हा पैसा त्या मुलामुलींच्या स्वकमाईचा नाहीच. त्यातले १००० जण तिथं उपस्थित होते. आता माणशी एक लाख रूपयांनी मोजलं तरी तीन दिवसांच्या मौजमजेसाठी १८०० माणसांकडून १८ कोटी रूपये गोळा झाले असं दिसतं. किती? अठरा कोटी..! आणखी धक्कादायक गोष्ट अशी आहे की, मागच्या एका वर्षभरात कोविड निर्बंध असतानाही असे अनेक कार्यक्रम झालेले आहेत आणि त्यापैकी तीनशे कार्यक्रमांवर ह्याच पथकानं कारवाई केली आहे. एका वर्षाला तीनशे पासष्ठ दिवस अन् एका वर्षभरात तीनशे कारवाया…! पण आपल्याला मात्र तीनशे एकावी कारवाई दिसली. कारण ती ब्रेकिंग न्यूज होऊन समोर आली. का बरं? कारण एकच – शाहरूख खानचा मुलगा त्यात सापडला आणि त्याचा गुन्हाही सिद्ध झाला..! 

आपल्या मुलानं किंवा मुलीनं दीड-दोन लाख रूपये तीन दिवसांच्या क्रूझवरच्या पार्टीसाठी भरले आहेत, हे पालकांना ठाऊकच नव्हतं, असं नक्कीच नसणार. आणि खरोखरच, अनेक पालकांना ह्यातलं काहीच ठाऊक नसेल तर त्यांची परिस्थिती नक्की म्हणजे नक्की गंभीर आहे. आपला मुलगा किंवा मुलगी चार-पाच दिवसांसाठी घरातच नसणार आहे, हे तरी ह्यांच्यापैकी कितीजणांच्या पालकांना माहिती होतं? आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नेमकं काय चाललंय हे माहितीच नाही, हे कितीही धक्कादायक असलं तरी एकवेळ समजून घेऊ पण घरातून दोन-दोन लाख रूपये ‘पार्टी’ साठी खर्च केले जातायत, याचीही कल्पना नसावी, हे मात्र पटत नाही. पैसे कुठल्या कारणासाठी खर्च केलेत हे नक्की माहिती असणार म्हणजेच आपल्या मुलामुलींचे हौसमौज करण्याविषयीचे, ‘रिलॅक्स’ किंवा ‘चिल’ होण्याविषयीचे, ‘जरा एन्जाॅय’ करण्याविषयीचे विचार काय आहेत, हे पालकांना निश्चित माहिती असणार आणि हे सगळं ह्या १८०० पालकांनी स्विकारलेलं असणार..! खरा धक्का हाच आहे…! 

ज्यांना अटक झाली आहे, त्या मुलांचे पालक त्यांच्यासाठी कपडे घेऊन जातात, बर्गर घेऊन जातात, घरचं अन्न घेऊन जातात म्हणजे पालकांना ह्या सगळ्याची सवय आहे, हे उघड आहे. क्रूझवरच्या तीन दिवसांच्या ‘हाय प्रोफाईल’ पार्टीसाठी दोन लाख रूपये भरणारा मुलगा किंवा मुलगी घरी जेवत असेल? त्याच्या घरी त्याची आई स्वयंपाक करत असेल? हे खरं वाटत नाही. “मां का प्यार” किंवा “घर का खाना” ह्या संकल्पना तरी ह्या मुलांना माहिती असतील का? आज पोलिस स्टेशनमध्ये धावत गेले तसे शाळांच्या पालकसभांना कधी यांचे पालक गेले असतील का? 

आपली मुलं दिवसभर काय बघतात, कुणाशी बोलतात, काय बोलतात, त्यांच्या गप्पांचे विषय काय असतात, त्यांची स्वप्नं काय आहेत, ध्येयं आहेत का, असलीच तर ती कोणती आहेत, ते ध्येय साध्य करण्यासाठीची इच्छाशक्ती आपल्या मुलांमध्ये आहे का, असलीच तर ती दिसते का, जाणवते का, आपल्या मुलांसमोरचे आदर्श कोणते आहेत, कोणत्या प्रकारचं आयुष्य त्यांना आवडतं, कोणती जीवनशैली आवडते, का आवडते, आपली मुलं कुणाचं अनुकरण करतात, का करतात, त्यांच्यावर कुणाचा प्रभाव आहे, का आहे, पैसा-संपत्ती-स्टेटस यांच्याकडे पाहण्याचा आपल्या मुलांचा दृष्टीकोन कसा आहे, पैशाकडे पाहण्याची त्यांची वृत्ती कशी आहे, उपलब्ध साधनांचा उपयोग आणि विनियोग आपली मुलं कसा करतात, एखाद्या अवघड क्षणी स्वत:हून एकट्यानं निर्णय घेण्याची वेळ आली तर योग्य निर्णय घेता येईल का, त्यासाठीचं पुरेसं ज्ञान किंवा तारतम्य त्यांच्याकडे आहे का…. केवढी मोठी यादी आहे.. यातला एक तरी प्रश्न ह्या मुलांच्या पालकांना पडत असेल का ? याचं उत्तर “नाही” असंच आहे, हे दुर्दैवानं आणि अतिशय खेदानं मान्य करावं लागतं. 

ह्या मुलाच्या वडिलांचं नाव शाहरूख खान आहे, ते प्रसिद्ध अभिनेते आहेत, २०० कोटी रूपयांच्या घरात राहतात, त्यांच्याकडे अमाप धनसंपत्ती आहे, म्हणून त्यांच्या मुलाला अटक केल्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ झाली, असं वाटत असेल तर ती आपली फार मोठी चूक आहे. कारण, मिडीयानं ही बातमी टीआरपी साठीच्या स्वार्थापोटी प्रसिद्ध केली असं क्षणभर गृहित धरलं तरीही त्यातून समोर येणारं भीषण वास्तव नाकारता येण्यासारखं नाही. देशभरातल्या पालकांनी खरोखरच अतिशय संवेदनशील होऊन साकल्यानं विचार करावा, चिंतन करावं अशीच ही घटना आहे. आज आपण शाहरूख खानच्या पालकत्वाची लक्तरं काढतोय पण सर्वसामान्य कुटुंबांमध्ये वेगळं चित्र आहेच कुठं? फक्त पोलिसी कारवाई होत नाही, मुलांना पकडून चौकीवर नेलं जात नाही एवढाच काय तो फरक. म्हणून, शाहरूख खान अजाण पालक आणि आपण सगळे सुजाण पालक असं होत नाही. आपणही त्याच भोकं पडलेल्या बोटीत आहोत, फक्त शाहरूख खान आपल्याआधी बुडाला..

मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलं जेव्हा तंबाखू-गुटखा-मावा-जर्दा-पान मसाला खातात, सिगारेटी ओढतात, दारू पितात, ते कशाचं द्योतक आहे? साध्या कुटुंबातली मुलं मित्रांसोबत सहलीला जातो असं सांगून गोव्याला जातात अन् दिवसरात्र दारू पिऊन तर्र होऊन पडतात, त्यातून काय दिसतं? पावसाळ्यात मुलंमुली घरी अजिबात पत्ता लागू न देता खडकवासला, पानशेत, भुशी डॅम, लोणावळा, खंडाळा, पाचगणी, कास पठार, ताम्हिणी अशा ठिकाणी तोकड्या कपड्यांमध्ये, एकमेकांच्या मिठीत धबधब्यांमध्ये चिंब भिजत असतात, ते कशाचं प्रतिक असतं? मित्राचा किंवा मैत्रिणीचा वाढदिवस आहे असं सांगून आपली मुलं डान्स बार किंवा पबमध्ये जातात ते काय असतं? रात्री साडेनऊनंतरसुद्धा तळजाईवर, पर्वतीच्या पायऱ्यांवर, हत्तीचौकात, कात्रज सर्पोद्यानाबाहेर, डेक्कनच्या पुलावर, झेड ब्रिजवर, जंगली महाराज आणि फर्ग्युसन रस्त्यावर एकमेकांना लोहचुंबकासारख्या चिकटलेल्या मुलामुलींच्या पालकांना आपल्या पाल्यांमधल्या विकसित झालेल्या ‘चुंबकीय’ गुणांची माहिती असते का? आपली मुलंमुली त्यांच्या स्मार्टफोन्सचा, इंटरनेटचा उपयोग कसा करतात हे पालकांना नक्की आणि नेमकं ठाऊक असतं का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा “नाही” अशीच आहेत..! 

म्हणूनच तर प्रश्न उभा राहतो की, दोन लाख रूपये खर्च करून क्रूझवरच्या हाय प्रोफाईल पार्टीत ड्रग्ज घेणारा आर्यन खान आणि सामान्य मध्यमवर्गीय नोकरदार कुटुंबातला अपार्टमेंटच्या गच्चीवर दारू पिणारा मुलगा ह्यांच्या अंध:पतनाची तुलना केली तर त्यांच्यात फरक कुठंय? आर्थिक क्रयशक्तीचा फरक वगळता पातळी घसरणं समानच आहे की..! 

नटसम्राट मधले बायको-पोरांसमोर अन् नातवंडांसमोर दारू पिऊन तर्र होणारे अप्पा, झेंडा चित्रपटातला संत्या, सातच्या आत घरात मधली देवघरातल्या समईवर सिगारेट पेटवणारी मुलगी, ती सध्या काय करते मध्ये मित्राची दारू पिण्याची इच्छा पूर्ण करणारी मैत्रिण ह्या सगळ्या व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर आणून पहा. मग गंगाजल मधल्या बच्चा यादव आणि साधू यादवला दोष का द्यायचा? तिथंही आपला वैचारिक घोळच होतो. आपण त्या चित्रपटातल्या यादव पितापुत्रांना दोष देतो, पण सतत भकाभका सिगारेटी ओढणारा अन् दारू पिणारा जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक पदावरचा आयपीएस अधिकारी अमित कुमार आपल्याला अजिबात चुकीचा वाटत नाही..! त्याचं व्यसन आपल्या डोळ्यांना दिसत नाही..! 

आपण घराघरातून आण्णा नाईक अन् शेवंताचे चाळे चवीनं पाहणार अन् आपल्या मुलांनी मात्र ‘श्याम’ व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर तसं होणार नाही. आपण ‘इकुडची का तिकुडची’ बघण्यात रमणार आणि आपल्या मुलांनी मात्र अभ्यासात झोकून द्यावं असं आपल्याला वाटत असेल तर आपण स्वत:च अतिशय गोंधळलेले आहोत हे मान्य करा. आपण मनोरंजनाच्या नावाखाली घरातल्या मोठ्या स्क्रीनवर घराघरातले कौटुंबिक कलह, पाताळयंत्रीपणा, विवाहबाह्य संबंध बघणार आणि त्याच मनोरंजनाच्या नावाखाली आपली मुलं त्यांच्या खोलीत त्यांच्या स्मार्टफोनवर विविध ‘मनोरंजक’ साईट्स बघणार, साहित्य वाचणार आणि डॅशिंग किंवा ब्युटीफूल व्यक्तिमत्वांशी मैत्री करणार.. दिवसेंदिवस आपण त्या सिरीयल्समध्ये रममाण होणार, तशीच आपली मुलंमुलीही त्यांनी निवडलेल्या जगात रममाण होणार.. फरक आहेच कुठे?

मोठमोठ्या शहरांपासून ते छोट्या गावांपर्यंतच्या व्यसनमुक्ती केंद्रांची वाढती संख्या आणि तिथं दाखल होणाऱ्या व्यक्ती पहा. खरोखर एकदा भेट देऊन माहिती घेऊन पहा. जगण्यातलं काळंकभिन्न वास्तव तुम्हाला दिसेल. हजारो कोटी रूपयांची संपत्ती असणाऱ्या आर्यन खाननं व्यसनावर संपत्ती उधळली ते मिडीयानं चार दिवस मोठ्या चवीनं दाखवलं. पण चार आकडी मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांमधल्या पोरांना व्यसनमुक्ती केंद्रात पकडून आणून दाखल करावं लागतं, तेही बघा. मिडीया ते दाखवणारच नाही, कारण त्या पोरांचे पालक सेलिब्रिटी नसतात. मिडीयाला त्या बातम्या दाखवून काय मिळणार? ना टीआरपी, ना पैसा.. पण तुम्ही मात्र जरूर पहा, अभ्यास करा, तथ्य जाणून घ्या. ती पोरं आणि आर्यन खान ह्यांच्यात फरकच नसल्याचं तुम्हाला दिसेल..! जर फक्त सेलिब्रिटींचीच पोरं चुकत असतील आणि वाया जात असतील तर मग समाजातली पुनर्वसन केंद्रं आणि व्यसनमुक्ती केंद्रं रूग्णांनी ओसंडून का वाहतायत? व्यसनमुक्तीसाठीचे स्वमदत गट खेडोपाडी का वाढतायत? ह्याचाच सरळ स्पष्ट अर्थ असा होतो की, समाजाच्या वार्तनिक शिष्टाचाराच्या चौकटीच निखळत चालल्या आहेत. आणि त्याला जबाबदार आहेत हे सगळे व्यंकू अन् त्यांच्या राजरोस चाललेल्या शिकवण्या..! कोण आहेत हे व्यंकू?

ड्रग्ज घेणारा आर्यन खान आपल्याला दोषी वाटला आणि आपण त्याची निंदानालस्ती करतो आहोत. पण मग दिवसाढवळ्या पोलिसांवर हात उचलणाऱ्या तरूणांचे व्हिडीओ आपण सोशल मीडीयावर पाहतो. पोलिसांवर हात उचलणाऱ्या, घाणेरड्या शिव्या देणाऱ्या महिला आपण पाहतो. त्यांचे पालक तर सेलिब्रिटी नसतात ना? ही माणसं उच्चभ्रू नसतात ना? मग तेव्हा आपण व्यक्त का होत नाही? आजूबाजूला माणसं व्हिडीओ शूट करत उभी राहतात पण त्या टवाळ पोरांच्या मुस्काटात मारण्याचं धाडस करत नाहीत, मग या माणसांना आर्यन खानला धारेवर धरण्याचा अधिकारच नाही. कारण, हे सगळे ‘व्यंकू’ आहेत.. समाजातल्या अपप्रवृत्तींना खतपाणी मिळायला पोषक वातावरण देणारे ‘व्यंकू’..!

पालकांनी पालकत्वाची चौकट सोडली की सगळं बिघडत जातं. सिगारेट विकणाऱ्या विक्रेत्याला त्याच्या समोरच्या अठरा-वीस वर्षं वयाच्या मुलाला सिगारेट विकत देताना काहीच वाटत नसेल का? त्या मुलामध्ये त्याला स्वत:चं पोरगं दिसत नसेल? दिसतच नसणार. नक्की दिसत नसणार. कारण, ती सावधपणाची दृष्टी त्याच्याकडं असली असती तर स्वत:च्या व्यवसायाला झळ बसणं सोसणं स्विकारून त्यानं त्या मुलाला सिगारेट देणं नाकारलं असतं. दारू-सिगारेट-तंबाखू-गुटखा विकणाऱ्या किती जणांमध्ये दिसतं असं पालकत्वाचं चारित्र्य? शोधून पहा बरं. तुमची घोर निराशा होईल. हे सगळे विक्रेते ‘व्यंकू’ आहेत आणि आपल्या समाजातल्या तरूण उगवत्या पिढीची शिकवणीच घेतायत. 

शाळकरी पोरं दिवस-दिवसभर गेम पार्लरमध्ये खेळत असतात, त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येतात, याचं त्या पार्लरवाल्याला देणं-घेणं असतं का? तो म्हणेल, “हा माझा व्यवसाय आहे. असला विचार करत बसलो तर व्यवसायच बुडेल माझा.” कितीतरी मुलंमुली अगदी नित्यनेमानं ठराविक स्टाॅल्सवर खायला जातात. त्यांच्याकडे हे पैसे आले कुठून, दिले कुणी, घरी माहिती आहे का असली चौकशी तो स्टाॅलवाला करत बसत नाही. त्याच्या दृष्टीनं त्याचा धंदा आणि त्यातला नफा महत्वाचा. माझ्या दृष्टीनं हे सगळे व्यंकूच..

सर्वसामान्य कुटुंबांमधल्या मुलांपर्यंत या गोष्टींची माहिती पोचते तरी कशी? ती पोचते जाहिरातींमधून. केवळ कमर्शियल जाहिरातींमधून नव्हे. सिनेमा-सिरीयल्समधल्या व्यक्तिरेखा, त्यांच्या सवयी, त्यांच्या स्टाईल्स, त्यांचं वर्तन, जीवनशैली हे असं काही समोर आणलं जातं की, भल्याभल्यांचा तपोभंग होतो. मिडीयाचा महिमाच तसा आहे..! हे सगळे निर्माते-दिग्दर्शक व्यंकूच आहेत. “आम्ही फक्त व्यक्तिरेखेला प्रामाणिकपणे न्याय देतो, तो आमच्या व्यवसायाचा भागच आहे, बाकी कशाशी आमचा काहीही संबंध नाही” अशी मखलाशी म्हणजे शुद्ध निर्लज्जपणा असतो. पण एकदा व्यंकूचं भूत अंगात शिरलं की, शहाणपणा, विवेकबुद्धी, नैतिकता, सामाजिक जाणीव वगैरे गोष्टी कस्पटासमान वाटायला लागतात.

हा मिडीया नावाचा व्यंकू तर ह्या सर्वांमध्ये मोठा आणि अत्यंत धूर्त आहे. आपली अन् आपल्या मुलांची व्यवस्थित शिकवणी घेतोय. ज्ञान अन् मनोरंजनाच्या नावाखाली अनेक गोष्टींची बेमालूम लागवड घराघरातून होतेय. हा व्यंकू इतक्या चलाखीनं त्याचे शिष्य तयार करतोय की, आपल्याला शेवटपर्यंत पत्ताच लागत नाही. 

आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं की, ह्या व्यंकूंना शोधून त्यांच्या शिकवण्या बंद पाडल्या पाहिजेत, पण ते माझं काम नाही. कुणीतरी अशोक कामटे यावेत आणि त्यांनी ते काम करावं. कुणीतरी कृष्णाप्रकाश यावेत आणि त्यांनी ते काम करावं. कुणीतरी समीर वानखेडे यावेत आणि त्यांनी ते काम करावं. मग आपण काय करणार?  आपल्याला काहीच जमणार नाही का? आधीच तयार झालेल्या व्यंकूंना धडा शिकवण्याचं, वठणीवर आणण्याचं आणि शिक्षा देण्याचं काम न्याय व्यवस्था करेल. पण भविष्यात व्यंकू तयारच होऊ नयेत आणि त्यांच्या शिकवण्या चालूच नयेत यासाठी जागरूक होणं, सजग होणं आणि समाजातल्या प्रत्येक घटकाची काळजी स्वत:हून घेणं हे तरी आपण करू शकतो ना? मग निदान ते तरी करूया.. पुढं होऊया आणि ही व्यंकूंची फॅक्टरीच बंद पाडूया..! 

©मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ञ, संचालक-प्रमुख 

आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पुणे.

Leave a Comment