“दोनशे रुपये”
शेवटी एकदाचा कॉल संपला तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. लगेच भाजीसाठी बाहेर पडले.
ऑफिसच्या कामामुळे दोन दिवस जमलं नाही पण आज जावच लागणार होतं, घरातली भाजी ही संपली होती आणि परत लॉकडाऊनची शक्यता होती. त्यात तासाभराने पुन्हा एक कॉल होता.
घाईघाईने गाडी घेऊन घराबाहेर पडले तर रस्त्यावर तोबा गर्दी होती. नेहमीच्या ठिकाणी भाजीच्या गाड्यांसमोर गिऱ्हाईकांची झुंबड होती. सगळ्या भाजीवाल्यांमध्ये एक म्हातारबा गिऱ्हाईकांशी अतिशय आदबीने बोलत होते. त्यांचं बोलणं, वागणं लक्ष वेधून घेणारं होतं. मी त्यांच्याकडेच गेले. अंदाजे सत्तरी पार केलेले, उभा चेहरा, सगळे दात साथ सोडून गेलेले, मोठाले डोळे, पायजमा शर्ट, पांढरी टोपी, दोरी असलेला चंदेरी फ्रेमचा चष्मा, शर्टच्या खिशात दोरी लावलेला मोबाईल अशा अवतारातल्या हसतमुख म्हातारबांनी स्वागत केलं.
“या माउली,काय देऊ”… भारी वाटलं.
आताशा अशा सौज्यानाची सवय राहिली नाही.
“भाजी ताजी आहे ना..?”
“माउली, सकाळीच आणलीय. बिनधास्त घ्या.”
सगळ्या भाज्या खरोखर चांगल्या होत्या. आठ दिवस पुरतील या हिशोबाने भाज्या घेतल्या.
“बाबा,एवढी भाजी घेतली.
काहीतरी कमी करा आणि कढीपत्ता द्या. त्याचे पैसे देणार नाही”
“माउली,तुमच्याकडून कशाला जास्त घेईन. दोनशे वीस झाले.दोनशे द्या”
म्हातारबा हसून एवढ्या प्रेमानं बाबा बोलले की आपसूक हात पर्समध्ये गेला. पैसे काढत असतानाच मोबाईल वाजला. बॉसचा फोन.
“येस सर”
“मेल चेक कर, दहा मिनटात रिप्लाय दे. इट्स अर्जंट” फोन कट झाला.
बॉसच्या आवाजावरून टेन्शनची कल्पना आली. तातडीने भाजीची पिशवी गाडीला लावून घाईघाईने घरी निघाले.
“माउली, अवो ताई,”
म्हातारबा हाका मारत आहेत असं वाटलं पण मी लक्ष दिलं नाही. अर्जेंट मेलच्या नादात घरी पोहचले अन लॅपटॉपमध्ये तोंड खुपसून बसले.
तासाभराने काम संपल. टेन्शन कमी झालं. कॉफी पिताना भाजीची पिशवी पाहिल्यावर लक्षात आलं की अजून भाजी धुवायची आहे. सगळ्या भाज्या बाहेर काढल्या आणि हिशोबाला सुरवात केली. म्हातारबांनी केलेला हिशोब बरोबर होता. चक्क कढीपत्ता फुकट दिला होता. रिकामी पिशवी पुन्हा एकदा झटकली तेव्हा शंभरच्या दोन नोटा खाली पडल्या. नोटा पाहून डोक्यात लख्ख प्रकाश पडला की मेलच्या नादात पैसे न देताच आपण भाजी घेऊन आलो आहोत.
“ अय्योssssss ”मी जोरात किंचाळले.
“काय गं,काय झालं” घाबरून नवऱ्यानं विचारलं.
सगळा प्रकार सांगितला. त्यावर तो म्हणाला
“बरय की मग, भाजी फुकट मिळाली…”
“काहीही काय!!.”
“म्हातारबा बिचारे माझ्याशी चांगले वागले आणि मी पैसे न देताच…
माझ्याविषयी ते काय विचार करत असतील.”
“हे बघ, उगीच इमोशनल होऊ नको”
“त्याचं विनाकारण नुकसान झालं हो..”
“पण तू मुद्दाम केलं नाहीस ना”
“हो तरी पण नुकसान ते नुकसानच”
“मग आता काय करणार ???”
“मी जाऊन पैसे देऊन येते”
“ अग…बाहेर मुसळधार चालूये. उद्या सकाळी दे…”
“अरे पण…
मनाला चुटपूट लागलीय. म्हतारबा हाक मारत होते पण दुर्लक्ष केलं. मी अशी का वागले??.डफर…”
“तू ओव्हर रिऍक्ट करतेस.
एवढं पॅनिक होण्यासारखं काही झालेलं नाही
नवरा वैतागला.
“मला खूप अपराधी वाटतंय.
म्हतारबांचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाही.”
“मग चेहरा पाडून दु:ख व्यक्त करत बस. मला काम आहे. ऑल द बेस्ट आणि कॅर्री ऑन”
कुत्सितपणे बोलून तो लॅपटॉपमध्ये हरवला.
माझी अवस्थता वाढली. शिकलेली माणसं अशीच फसवाफसवी करतात. नावालाच चांगल्या घरातली…”
बाकी ……असं म्हणत भाजीवाल्या बाबा शिव्या हासडतायेत असं वाटायला लागलं.
नको त्या विचारांचे डोक्यात थैमान सुरु झालं. कामात लक्ष लागेना. झालेल्या गोष्टीबद्दल मनात दहा वेळा बाबांची माफी मागितली.
तडक जाऊन पैसे देऊन यावे असा विचार आला. पावसाचा जोर होताच तरीही नवऱ्याचा विरोध असतानाही गाडीवर बाहेर पडले परंतु म्हातारबा भेटले नाहीत.
निराश होऊन घरी परतले. माझ्या पडलेल्या चेहऱ्यावरून काय झालं ते नवऱ्याला समजलं. काही बोलला नाही पण खऊटपणे हसला.
नंतरचा माझा सगळा वेळ प्रचंड बेचैनीत गेला. दुसऱ्या दिवशी घाईघाईत घरातली काम आटपून पैसे द्यायला गेले पण म्हातारबा दिसले नाही. आजूबाजूला चौकशी केली पण कोणालाच बाबांविषयी माहिती नव्हती. प्रचंड निराश झाले.अपराधी भाव प्रचंड वाढला. त्यामुळे विनाकारण चिडचिड सुरु झाली.
“बास आता,अति होतंय”
इतका वेळ समजून सांगणारा नवरा डाफरला.
“तुला माहितीय म्हातारबांना पैसे दिल्याशिवाय मला चैन पडणार नाही”
“तू प्रयत्न केलेस ना. थोडी वाट पहा. जेव्हा त्यांना भेटशील तेव्हा दे.
आपल्याला पैसे बुडवायचे नाहीत.”
“आता आठ दिवस लॉकडाऊन आहे”
“म्हणजे दोनशे रुपयांचे भूत आठ दिवस डोक्यावरून उतरणार नाही”
नवऱ्यानं चिडवलं तेव्हा मला सुद्धा हसायला आलं.
लॉकडाऊनच्या काळात सुद्धा काहीतरी निमित्त काढून भाज्यांच्या गाड्या जिथं असतात तिथं रोज जात होते पण एकदाही बाबा भेटले नाहीत.
म्हतारबांविषयी सारखी चौकशी करत असल्याने तिथले भाजीवाले ओळखायला लागले होते. लॉकडाऊन संपल्यानंतर एका भाजीवाल्याने म्हतारबांच्या भाजी विकणाऱ्या नातवाविषयी सांगितले.
“दादा, मला तुमच्या आजोबांना भेटायचे आहे”
नातवाने विचित्र नजरेने माझ्याकडे पाहत विचारलं.
“कशासाठी ??काय काम आहे ??”
“कुठं भेटतील ??”
“ते आता नाहीत”
_नातवाने उत्तर दिल्यावर माझ्या काळजात धस्स झालं.
चटकन डोळ्यात पाणी आलं.=
“म्हणजे ????”
मी घाबरून मी विचारलं.
“आज्याची तब्येत बरी नायी. घरीच हाय. ते आता गाडीवर येणार न्हाईत.”
म्हतारबा सुखरूप आहेत कळल्यावर जीवात जीव आला.
“मला त्यांना भेटायचंय. पत्ता देता, प्लीज”
नातवाच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून मी घडलेला प्रकार सांगितला.
“माज्याकडे द्या. आज्याला देतो.”
“नाही मला बाबांनाच भेटायचंय. त्यांची माफी मागायचीय”
त्याने घरचा पत्ता दिला.
ताबडतोब नवऱ्याला घेऊन वस्तीत गेले. एकाला एक लागून असलेली घरे आणि त्यांच्यामधेच असलेला जेमतेम पाच फुटांचा रस्ता. अरुंद बोळ, उघडी गटारं, धो धो वाहणारे नळ, तिथंच कपडे धुणाऱ्या बायका, खेळण्यात हरवलेली लहान मुलं…, अशा परिस्थितीत पत्ता विचारत वस्तीच्या आत आत चाललो होतो. अलीबाबाच्या गुहेसारखं वस्तीच्या आत एक निराळंच जग होते.
अर्ध्यातासाच्या पायपिटी नंतर एकदाचं घर सापडलं.
“आजोबा आहेत का??”
दारात तांदूळ निवडत बसलेल्या आजींना विचारल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्नचिन्ह ????
त्यांनी हाका मारल्यावर म्हातारबा बाहेर आले.
“आजोबा, ओळखलं का ?”
“वाईच थांबा.चष्मा आणतो.”
म्हातारबा चष्मा घालून आले. मी तोंडावरचा मास्क बाजूला केला.
“आ…,माउली..,तुमी इत..????,
या या आत या.”
म्हतारबांचे आदरातिथ्य पाहून आम्ही दोघंही भारावलो.
घरी आलेल्यांचे मनापसून स्वागत होणं. हे आजकाल दुर्मिळ झालंय.
“बाबा,पुन्हा येईन. आज जरा घाईत आहे. पैसे द्यायला आले होते.”
“कसले पैसे????”
“भाजीचे…., त्या दिवशी गडबडीत…..”
दहा दिवसांपूर्वी घडलेला प्रकार मी सांगितला तेव्हा म्हातारबा प्रसन्न हसले.
“माफ करा. चुकून झालं…
मी हात जोडले.
“अवो, कामाच्या गडबडीत व्हतं अस. माऊली, हे पैशे मिळणार याची खात्री व्हती.”
“कशावरून??”
“माणूस चांगला की लबाड हे.माणसाच्या बोलण्या-वागण्यावरून ह्ये अनुभवी नजरंला बरुबर समजतं”
“ताई, पैशासाठी यवडी इतवर आलात तवा घोटभर च्या तरी घ्याच.”
आजीबाईंचा आग्रह मोडता आला नाही. चहा घेऊन निघताना….
“बाबा, पुन्हा सॉरी…..”
मी वाकून नमस्कार केला तेव्हा म्हातारबांनी थरथरता हात डोक्यावर ठेवून भरभरून आशीर्वाद दिला.
खूप खूप मस्तं वाटलं…
“हॅप्पी ?”
घरी जाताना नवऱ्याने विचारलं…
तेव्हा मी मान डोलावली.
“पैसे दिले नसते तरी चाललं असत बाबा तरसाफ विसरले होते”
“ते विसरले होते पण मी नाही. त्या चुकीची सल मला त्रास देत होती.”
“काय मिळवलं एवढं सगळं करून??”
“ मनःशांती…!!
मोजता येणार नाही असं समाधान मिळालं. ही धावपळ बाबांच्या पैशासाठी नाही तर स्वतःसाठी केली.
माझ्यातला चांगुलपणा जिवंत ठेवण्यासाठीच हा सगळा आटापिटा.
बोलताना आपसूकच डोळे भरून आले. नवऱ्याच्या चेहऱ्यावर प्रचंड कौतुक होते…
_नकळत त्याने माझा हात घट्ट पकडला.
✍️मंगेश मधुकर