दोन कथा

Rate this post

 दोन कथा आहेत, दोन्ही कथा वाचल्या तर आपल्या लक्षात येईल की आपण आज जे काही करतो त्याचा पुढील पिढीवर परिणाम कसा होतो !!!

=================

पहिली कथा

=================

आपल्याला अल कॅपोन माहीत असेलच, एके काळचा शिकागोचा सर्वात मोठा डॉन. त्याने अक्षरशः शिकागो वर राज्य केले आहे. दरोडे असो कि खून किंवा जुगार किंवा वेश्यागृहे, तुम्ही ज्या कुठल्या गुन्ह्याची कल्पना करू शकाल ते सगळे गुन्हे अल कॅपोनने केले होते. “इझी ऐडी” असे टोपण नाव असणाऱ्या आणि कायद्याला वाट्टेल तसं वाकवू शकणाऱ्या वकिलाच्या मदतीने कायद्याच्या कचाट्यातून हा माणूस मात्र नेहमीच सुटत आला.

या बदल्यात इझी ऐडीला अल कॅपोनने जबर पैसा, मोठे घर वगरे सगळ दिलं. इझी ऐडीच घर एखाद्या नगराएवढे मोठे होते. संपूर्ण सुरक्षा होती. नोकरचाकर देखील होते दिमतीला. या ऐडीचा जीव मात्र एकुलत्या एका पोरात होता. गुन्हेगारी विश्वाचा एवढा मोठा वकील पण त्याने आपल्या पोराला मात्र या सगळ्यापासून दूर ठेवले. सत्य असत्याची जाण करुन दिली. ऐडीला नेहमी वाटायचं की आपला मुलगा मोठा झाला की त्याला समाजात आदरयुक्त स्थान असावे. इतकी प्रचंड संपत्ती असून ऐडी मात्र आपल्या मुलाला न चांगले नाव देवू शकत होता न चांगली उदाहरणे.

एका दिवशी ऐडीला ही घुसमट पेलवेना आणि त्याने अल कॅपोनची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला याची किंमत माहीत होती. अक्ख्या शिकागोवर राज्य करणार्या डॉनच्या विरुद्ध तो उभा होता. पोलिसांना आणि कर अधिकार्यांना त्याने अल कॅपोन विरुद्ध सगळी माहिती आणि पुरावे दिले.

परिणाम भीषण झाला. एका दिवशी भर रस्त्यात त्याची हत्या झाली. पण त्याने त्याच्या मुलासाठी मात्र एक उदाहरण निर्माण केले होते. सत्यासाठी जीवही जाऊ शकतो. राह कठीन है मगर अंतिम जीत सत्य कीही होती है !!!

पोराला हे शिकवण्यासाठी त्याने सर्वोच्च बलिदान दिले होते !!

पोलिसाना ऐडीच्या खिश्यात रोझरी आणि एक कविता सापडली

The poem read:

The clock of life is wound but once,

and no man has power to tell just when the hands will stop

At, later or early hour

Now is the only time you own.

Live, love, toil with a will

Place no faith in time

For the clock may soon be still

===============================

दुसरी कथा

===============================

दुसऱ्या महायुद्धाने जगाला अनेक हिरो दिले. असाच एक साहसी योद्धा होता Butch O’Hare. फायटर पायलट असलेला बुच विमानवाहक युद्धनौका Lexington वर होता या महायुद्धात. साऊथ पैसीफिक या महासागरात ही युद्धनौका तैनात होती.

एका दिवशी अख्ख्या स्क्वाड्रनला एका मिशन वर पाठवण्यात आले, आकाशात उडाल्यावर बुचच्या लक्षात आले कि त्याच्या विमानात पुरेसे इंधन नाही आहे. बेसकॅम्पनी त्याला परतण्याचा आदेश दिला. खट्टू मनानी बुचनी फॉरमेशन सोडले आणि परत यायला निघाला. परत निघालेल्या बुचला रक्त गोठवणारे दृश्य दिसले. मोठं जपानी स्क्वाड्रन बुचच्या युद्धनौकेवर चाल करून येत होते. अमेरिकन स्क्वाड्रन सोर्टीवर निघाले होते आणि त्यांनी युद्धनौका अक्षरशः हतबल होणार होती. बचाव करायला नौकेवर एकही विमान नव्हते आणि बुचच्या विमानात पुरेसे इंधन पण नसल्यामुळे तो अमेरिकन स्वाड्रनला परत आणू शकणार नव्हता. जपानी स्क्वाड्रनशी लढणे हा एकाच पर्याय बुचला दिसला आणि तो बेभानपणे जपानी फॉरमेशन मध्ये घुसला. असेल नसेल तो सगळा दारुगोळा त्याने वापरून काही जपानी विमानांना घायाळ केले. दारुगोळा संपल्यावर विमानाचे पंख त्याने शस्त्र म्हणून वापरायला सुरवात केली. जपानी स्वाड्रनची पाच विमाने त्याने पाडली होती आणि उरलेल्या जपानी स्क्वाड्रननी माघार घेतली.

आपल्या अतिशय नुकसान झालेल्या विमानाला बुचने कसे बसे युद्धनौकेवर उतरवले. विमानात असलेल्या कॅमेराने बुचचा भीम पराक्रम रेकॉर्ड केला होता. बुचच्या या पराक्रमाची सगळ्यांनी दाद दिली. आसमंतात ऐकू जातील इतक्या जोऱ्यात टाळ्या वाजवण्यात आल्या. २० फेब्रुवारी १९४२ ला केलेल्या या पराक्रमासाठी बुच नौसेनेचा FIRST ACE OF WWII झाला आणि शौर्यपदकांनी त्याचा सन्मान करण्यात आला.

मात्र या अवघा २९ वर्षाचा महान योद्धा पुढील वर्षी एका हवाई कारवाईत मारल्या गेला. त्याच मूळ शहर त्याला विसरू शकणार नव्हते. त्याच्या शहराने त्या शहरातील विमानतळाला त्याचे नाव दिले.

आपण कधी शिकागोला गेलात तर O’Hare आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचा पुतळा बघा. टरमिनल १ आणि २ च्या मध्ये हा या वीराचा पुतळा !!!!

==================================

.

.

.

.

आता तुम्ही म्हणाल कि या दोन कथांचा एकमेकांशी काय संबंध

Butch O’Hare हा ईझी ऐडीचा मुलगा होता !

1 thought on “दोन कथा”

Leave a Comment