न ॠते श्रांतस्य सख्याय देवा: !!

Rate this post

 न ॠते श्रांतस्य सख्याय देवा: !!

—————–०००००००————

कालपरवा आशाभोसलेंच्या ८८ व्या वाढदिवसाची बातमी वाचली. लताजी त्यांच्यापेक्षा दोनचार वर्षांनी मोठ्या….नव्वदीत म्हणा! याही वयात संगीत विश्वात समरस होणाऱ्या या भगिनी …नव्हे आख्खं कुटुंबच !

लताजींच्या  वाढदिवसाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे …. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. वय अवघं ९९. लताजींच्या शंभराव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भाषण करायला मला बोलवा. मी येईन म्हणाले.’ हे म्हणण्याची उमेद आजही ९९व्या वर्षीही टिकून असलेला अवलिया!

 अभिनेत्री सुलोचनादीदी ९०!  चालता येत नाही पण आजही थिएटरात जाऊन सिनेमा बघायचं .. हे वेडे चोचले पुरवतात !

 रमेश देव . वय वर्षे ९२. आजही व्यायाम, पोहायला जाणं, पत्ते कुटायला क्लबमध्ये जाणं. !

 शास्त्रीय गायिका डॉ प्रभा अत्रे ८७ !   घरचं सगळं +  गुरुकुलाचा व्याप सांभाळणं!  गाडीही चालवतात, मुंबई-पुणं expressway वरही !

 आशा भोसले. आजही stage show  सगळंच त्याच आनंदानं….?  

लावणीवाल्या सुलोचना चव्हाण याही आज ८५ ! . पहाटे उठून पाणी भरण्यापर्यंत सर्वकाही करतात असं वाचलं!!!

नव्वदी पार केल्यावरही सक्रीय राहून आपलं आब राखून वट सांभाळणं म्हणजे मस्करी नव्हे ! No किरकीर, no उसासे

, no मृत्युसाठी करूणा भाकणं!!!!

अवघ्या नव्वदीच्या वयोमानापरत्वे येणाऱ्या व्याधी त्यांनाही असणारच. पण will power आणि ध्यास तोच…तारूण्यातलाच !!!

आपण आज सत्तरीच्या दरम्यानच या उंबरठ्यावरच आपलं गांडीव retire करू पाहणारे अर्जुन !!!!

 लतादीदी, बाबासाहेब पुरंदरे, सुलोचनादीदी, रमेश देव सारख्या दिग्गज लोकांची उदाहरणं दिलीत. खरं आहे, या लोकांनी मेहनतीनं आयुष्यातला प्रत्येक क्षण जगला आणि गाजवलाही. 

अशा व्यासंगी मनस्वी व्यक्तिंना जगण्याचं उदात्त प्रयोजन सापडलेलं असतं आणि म्हणूनच शंभराव्या वर्षीही पुढल्या ८/१० वर्षांची पोतडीत आखणी तयार असते. 

एक ऊर्जा देणारी विचारधारा बरंच काही सुचवून जाते. अशा प्रभृतींची मनाची ठेवणच जरा वेगळ्या वळणानं जोपासलेली असते. 

मला आठवतं खळेकाकांचा सत्कारसोहळा. त्यावेळी त्यांचं वय साधारण ८३/८४ असावं . अध्यक्षस्थानी त्यांच्यापेक्षा दोन अडीच वर्षानं लहान असलेले पाडगावकर ८१/८२ .

तसे दोघेही वयानं लौकिकार्थानं सिनियर सिनियर…. पण मनानं ? अहो , तरूणाईला लाजवेल असे लाघवी धष्टपुष्ट भक्कम उदात्त विचार….!!!

खळेकाका ओघात  म्हणाले….” मनात काही छान चाली रूंजी घालताहेत , केव्हा छान गाणी हाती पडतील , असं झालंय, बरंच काम करायचंय, पण माझा संगीत देण्याचा अधाशीपणा काही जात नाही….”

पाडगावकर मधेच उद्गारले….” खळेकाकांना संगीत द्यायचंय, आणि ते जर आत्ता थांबायला तयार नसतील तर मीही गाणी लिहिणं सोडायचा हट्ट स्वीकारणार नाही…‌‌ मी  म-रा-य-ला  तयार नाही नाही नाही…!”

दोघांची वयं ऐंशीच्या पुढे आणि काय ती ऊर्मी !!!

अहो, पुलंही अखेरच्या दिवसात बीपी वाढलं तर म्हणायचेत की याही वयात रक्त धमन्यात उसळी मारतंय हो….. आजाराकडे बघण्याची खट्याळ दृष्टि ! 

व्वा! ……

वेदांचं भाषांतर करणारे पंडित सातवळेकर हे वयाच्या शंभराव्या वर्षी वेदातले निवडक वेचे तरूणांसाठी घेऊन नवीन पिढीला ती माहिती करून देण्यासाठी प्रूफं चेक करत आणि ते काम ७/८ वर्ष पुरेल असं होतं. वय १०० आणि planning  पुढच्या ७/८ वर्षांचं !!! केवळ अद्भुत !!!! 🙏🏻

याला म्हणावं ” जगणं”….👌🏼

म्हणून शीर्षक ….

न ॠते श्रांतस्य सख्याय देवा: ! 

ज्याने श्रम केलेले आहेत, त्यांच्याशिवाय इतरांशी देव मैत्री करत नाहीत !!!

🙏🏻🙏🏻🙏🏻

©️ रामचंद्र जोशी पुणे

Leave a Comment