बारा कमी शंभर…
आशा भोंसले… (रिपोस्ट कितव्यांद्या तरी)…
आज या चिरतरुण आजींना ८९ वं वर्ष लागलं. आवाज आणि उत्साह मात्र १८ चा आहे. या वयात ‘आता उरलो सल्ल्यापुरता’ ही अवस्था आलेली असते आणि ही बाई या वयात सिनेमात काम करते, स्टेज शो करते, बिनधास्त मुलाखती देते, आत्मचरित्र लिहितीये, मुलीच्या अकाली निधनाचं दु:खं पचवतीये. आकड्यांच्या हिशोबातली वयं आपल्या सारख्या सामान्य माणसांना (चाळिशीत ग्रांड स्लाम जिंकलं परवा लिएंडर पेसनी), ही माणसं असामान्य. कुणाला चेह-यानी एखादवेळेस नाही वाटणार सुंदर पण ही बाई आवाजानी मात्रं चिरतरुण, सौंदर्यवतीच आहे. गौतम राजाध्यक्षांनी काढलेल्या त्या पाच भावंडांच्या प्रसिद्ध फोटोत आशाबाई सगळ्यात सरस दिसतात (आणि त्या एरवीही आहेत असं माझं मत आहे). वटवृक्षाच्या सावलीत बाकीची झाडं खुरटतात पण हे रोपटं मात्रं असं काही उंच झालं की हेवा करावा. स्वकर्तुत्वावर, स्वबळावर सहानुभूती न घेत, झगडत. त्यांच्या ऐकलेल्या, पाहिलेल्या, वाचलेल्या मुलाखतीतून, त्यांच्यावर आलेल्या लेखातून जेकाही समजलंय त्यावरून वाटतं की हे आपल्या बुद्धीच्या पलीकडचं काम आहे. त्याचं आत्मचरित्र येऊ घातलंय, त्यांच्यासारखच फटकळ, स्पष्ट असणार याची खात्री आहे. किती जणांची पितळं उघडी पडतील काय माहित.
पहिल्यांदा घरोघरी ठोक्याच्या कळशा असायच्या. तांबटाच्या एक पट्टीचे आणि हातोडीचे घाव सोसून तयार केलेली नक्षी, जगात असे तांबट हातोड्या आणि पट्ट्या घेऊन तयारच असतात. आशाताईंनी असे अनेक घाव सोसले पण एकही पोचा पृष्ठभागावर दिसू दिला नाही. त्यांच्या गालावरच्या खळ्यात आणि गाण्यात मधेच हसतात ना तशा हसण्यात सगळं लपवून टाकलं त्यांनी. पण बाई धीराचीच. त्यांच्या नावातच आहे हो सगळं, उगाच आपलं नाव सोनुबाई… हा प्रकार नाही. सुरेल गळा एवढीच पुंजी खरं तर. चोहोबाजूनी झालेली कोंडी, सहनायिकांसाठीची मिळणारी गाणी, कुणीतरी आज नाही म्हणून मिळालेली गाणी आणि कुणीतरी आज आहे म्हणून नाकारली गेलेली गाणी.
‘मेरा नाम जोकर’ ची सगळी गाणी त्यांची आहेत, तितर के दो आगे तितर, मोहे अंग लग जा बालमा आणि दाग न लग जाये. का? तर आर.के.चं थोरलीशी भांडण झालं होतं म्हणून. ‘मोहे अंग लग जा बालमा’ ला त्या जो उसासा टाकतात ना तो पद्मिनीला शारीरिक दाखवावा लागतो, त्या गळ्यातून दाखवतात. सुलोचना चव्हाण जशा अंगभर पदर घेऊन खाली मान घालून लावणीतला भाव चेह-यावर न आणता शृंगारिक लावण्या म्हणतात ना (आता त्यांचे कार्यक्रम होत नाहीत हे आपलं दुर्दैवं) तशा या आज्जीबाई गळ्यातून काय काढतील सांगता येत नाही. अनेक नवीन गायिका मादक, उडत्या चालीची गाणी गाताना तसेच अंगविक्षेप करावे लागतात या भ्रामक कल्पनेत तसं गात असतात. आशाताई रेशमी साडीत, एक चकचकीत ब्रेसलेट, कानात कुड्या अशा पेहरावात चढती जवानी…, ये मेरा दिल…, मेरा कुछ सामान…., नाच रे मोरा आणि युवती मना दारूण रण म्हणतात. देवानी गळ्यात कुठली चीप बसवून पाठवलंय, त्यालाच माहित.
त्यांच्या गाण्यांबद्दल बोलायचं म्हणजे पुस्तकच होईल (ते काम नेरूरकरांनी आधीच केलं आहे). पण काही मात्रं त्यांचीच. कुठली घ्यावी आणि कुठली वगळावी? नाच रे मोरा, भरजरी गं पितांबर, एका तळ्यात होती, मलमली तारुण्य माझे, चांदण्यात फिरताना, सोनियाच्या ताटी, बुगडी माझी, ही वाट दूर जाते, ये रे घना, ऐन दुपारी यमुनातीरी, केंव्हा तरी पहाटे, चुरा लिया है, खाली हाथ शाम, मेरा कुछ सामान, बेचारा दिल क्या करे, कतरा कतरा, इस अंजुमनमें, ये मेरा दिल, मोनिका, पान खाओ सैय्या आणि अशी कितीतरी. आशाबाई म्हणजे गाण्याचा मॉल आहे. बालगीत, प्रेमगीत, भावगीत, छेडाछेडी, उत्तान क्याब्रे, विरह, नाट्यसंगीत काय हवं ते मागा, सगळं अंडर वन रुफ आहे.
पान खाओ सैय्याच्या ताना काय अफाट आहेत, बेचारा दिल क्या करेचं हमिंग, चांदण्यात फिरतानाचा तो तालाशी खेळणारा आवाज, ये मेरा दिलच्या कडव्यात तर मला हेलनची घाई पण दिसते, बुगडी माझीचा कोवळा नवतरुणीचा, शारद सुंदर चा चंदेरी आणि सांज ये गोकुळी, झिनी झिनी वाजे चा धीरगंभीर. देणगीच ही, पडद्यावर जयश्री गडकर, वहिदा रेहमान, नितू सिंघ, झीनत अमान, सिमा, हेलन, बिंदू, रेखा, हेमा मालिनी पासून उर्मिला, तबू कुणीही असो ते गाणं त्या अभिनेत्रीचच वाटतं हे त्यांचं सगळ्यात मोठं यश आहे. मद्दड चेह-याच्या अभिनेत्रींसाठी त्या काय मेहनत घेतात हे एकदा विचारायला हवं त्यांना कुणीतरी.
दुस-यांच्या, त्यातल्या त्यात सेलेब्रेटींच्या, आयुष्यात घडलेले किस्से, प्रसंग, अडचणींच्या कहाण्या आपण मोठ्या चटकदार गोष्टी असल्यासारख्या वाचतो. पण तेंव्हा त्यांची अवस्था तेच जाणोत (ती ही माणसंच आहेत हे पण का विसरतो खरं तर). त्यांच्या ऐकीव, क्वचित पसरवलेल्या, ख-या, खोटया, सफल, असफल प्रेमकहाण्यांना आपण लफडी या एकाच शब्दात तोलून आपण मोकळे होतो. आशाबाई जेंव्हा लिहितील तेंव्हा कळेल भोसले, दादा कोंडके, ओ.पी.आणि आर.डी.यांच्या बद्दलचं सत्यं किंवा त्यांची बाजू. दुर्दैवानी आज चौघंही हयात नाहीयेत.
विभक्तं झाल्यावर त्यांनी सोसलेले हाल, उपसलेले कष्ट त्यांच्याच तोंडून ऐकायला हवेत. बोरिवलीहून त्या लोकलनी जायच्या. तुम्ही म्हणाल त्यात काय मोठंसं, अख्खी मुंबई जाते पण अख्खी मुंबई एवढी गाणी नाही गात. सांसारिक अडचणी, कराव्या लागणा-या तडजोडी, मानहानी, डावललं जातंय ही बोच हे सगळं एका कप्प्यात बंद करून माईक पुढे उभं राहिल्यावर त्यातले जे भाव असतील त्याच्याशीच फक्तं नातं जोडायचं हे खायचं काम नाहीये.
काही जोड्या जुळतात, काही प्रसिद्धी मिळवतात, काही कमनशिबी असतात. त्यांची ओ.पी.बरोबरची जोडी नशीबवान होती. ‘माझ्याशिवाय नाही तुम्हांला यश शक्यं’ असा प्रभाव असणा-या गायिकेला एकदाही न घेता हा माणूस शिखरावर गेला कारण त्याच्या सोबत तेवढाच दमदार (काकणभर सरसच माझ्या मते), कुठल्याही प्रकारच्या गाण्याची सवय असलेला, मुख्यं म्हणजे भाव ओतणारा (हल्ली स्वरांची बाराखडी असते, जर्रा इकडे तिकडे हलायचं नाही, भाव गेला तेल लावत) चिरतरुण आवाज होता. या जोडीनी धुमाकूळ घातला. बघा ना नमुना म्हणून ही गाणी : माँग के साथ तुम्हारा, उडें जब जब जुल्फें तेरी, आईएं मेहेरबां, ये हैं रेशमी जुल्फों का, जाईए आप कहाँ जाएंगे, आओ हुजुर तुमको, इशारों इशारों में, दिवाना हुआ बादल, बहोत शुक्रिया बड़ी मेहेरबानी, चैन से हमको कभी, हुज़ुरेवाला.
अशीच एक त्यांची जोडी फडके साहेबांबरोबर जुळली. स्पष्टं शब्दोच्चार, सोप्प्या वाटणा-या अवघड चाली आणि कुठलाही आव न आणता म्हटलेली गाणी. सहज गुणगुणता येतील इतक्या सोप्प्या वाटतात की नाही? म्हणून बघा, सोप्प्या नाहीत हे मान्यं करा आणि परत त्यांना ऐका, ते जास्तं सोप्पं काम आहे.
आर.डी., गुलझार आणि आशाताई हे एक वेगळंच त्रिकूट आहे. मोठ्ठ्या दवाखान्यात कसे वेगवेगळे स्पेशालिस्ट असतात तसं होतं यांचं. एक लेखणीचा जादूगार, एक तालासुरांशी रममाण झालेली वल्ली आणि एक – झालं का तुमचं फायनल, द्या इकडे – इतक्या सहजतेने गाणारा गळा. काय गाणी आहेत एकेक तिघांची. मेरा कुछ सामान… चालीसाठी दिल्यावर आर.डी. म्हणाला होता हे काय गाणं आहे? उद्या टाइम्सची हेडलाईन द्याल चाल लाव म्हणून. गुलझार म्हणाले, खरा संगीतकार त्याला सुद्धा लावेल. मग जे काही आर.डी.नी तयार केलंय ते मात्रं चिरंतन आहे. ही तिन्ही माणसं काळाच्या पुढे होती, काळाशी जुळवून घेणारी होती, लवचिक होती, यांचा आवाका मुळातच मोठा. म्हणूनच तेरे बिना जिंदगीसे लिहिणारा गुलझार छैया छैया, कजरारे कजरारे, नीले नीले जिंदे शामियाने के तले लिहू शकतो, सुनो चंपा सुनो तारा देणारा आर.डी. चिंगारी कोई भडके, मेरे नैना सावन भादो आणि रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम पण देतो. आशाबाईंबद्दल काय बोलणार पाण्यासारखा गळा. तुम्ही टाकाल तो रंग दाखवणारा.
संगीतकार नवीन असो किंवा प्रथितयश त्या १०० % गातात. बघा न रवि बरोबर : तोरा मन दर्पण कहलाए, आगे भी जाने ना तू, दिन हैं बहार के, दिल की कहानी रंग लाई हैं, इन हवाओं में, जिंदगी इत्तेफ़ाक़ हैं, एस. डी. बर्मन बरोबर अच्छा जी मैं हारी, नज़र लागी राजा, सच हुए सपने तेरे, चाँद सा मुखड़ा क्यों शर्माए, जानू जानू रे काहे खनके हैं, काली घटा छाये, अरे यार मेरे तुम भी हो गज़ब, अब के बरस भेज भैया को बाबुल, रात अकेली हैं (हे आणि होठोपे ऐसी बात आर.डी.नीच दिलंय म्हणे, ठेका बघितला तर मान्यं आहे), अन्नू मलिक कडे किताबे बहोतसी पढी होगी तुमने, रहेमानकडे रंग रंग रंगिला रे, तनहा तनहा, राधा कैसे न जले, मुझे रंग दे, ओ भंवरे, मदन मोहन कडे झुमका गिरा रे, संदीप चावटा कडे कंबख्त इश्क, सलिलदांकडे जानेमन जानेमन आणि खय्याम चा आख्खा उमराव जान.
त्यांची आर.डी.बरोबरची ही गाणी बघा : ओ हसीना जुल्फोंवाली, ओ मेरे सोना रे, आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, पिया तू अब तो आजा, दम मारो दम, मोनिका ओ माय डार्लिंग, चुरा लिया हैं तुमने, आपके कमरे में कोई, लेकर हम दीवाना दिल, जाने जाँ धुंडता फिरा रहा, खाली हाथ शाम, कतरा कतरा, छोटीसी कहानी से, ओ मारिया, रोज़ रोज़ आँखों तले, पिया बावरी, जाना ओ मेरी जाना, हैं अगर दुश्मन, ये लड़का हाए अल्लाह. किती देणार याद्या.
अनेक पुरस्कार मिळाले. फिल्मफेअर, आयफा, गिनीज बुक मधे नाव गेलं, जीवन गौरव मिळालं, फाळके पुरस्कार, पद्मविभूषण मिळालं. पण काहीतरी राहून गेलंच. मेरा नाम
जोकरच्याअपयशाबद्दल बोलताना राज कपूर म्हणाला होता. माझं एका आईसारखं झालंय, थोड मागे पडलेलं, अशक्तं, अपयशी मूल तिच्या जास्तं जवळचं असतं, तसं माझं
मेरा नाम जोकरच्या बाबतीत झालंय. तो माझ्या हृदयाजवळ आहे. आधीचं आणि नंतरचं उत्तुंग यश नाही त्याच्या हृदयाजवळ आलं. निसटलेलं, अपयश, हुकेलली संधी असंच शिल्लक रहात असेल का मनात? आशाताईंच्या मनाजवळ किती गर्दी असेल ना अशा गोष्टींची. ऐनवेळी नाकारलं गेलेलं ऐ मेरे वतन के लोगो, डावललं गेल्याची अनेक शल्यं, आर.डी.गेल्यानंतर झालेला मन:स्ताप आणि खूप काही.
एक उत्कृष्ट सुगरण, एक गोड गळ्याची लोभस खळ्यांची गायिका, एक बिनधास्त बाई, एक मिश्किल नकलाकार, एक यशस्वी उद्योगपती, टीका आणि हारतुरे एकाच भावनेने स्विकारणारं एक दिलखुलास व्यक्तिमत्व, एकटी पडली (किंवा पाडली) म्हणून हार न मानता यशस्वी होणारी जिद्दी स्त्री
आणि नंतर यश मिळालंय म्हणून कटूता न ठेवणारी. आपण फक्त एवढच लक्षात ठेवायचं.
आत्मचरित्र आलं की वाचायचं, जमलंच तर बिटवीन द लाईन्स.
जयंत विद्वांस
‘सत्तर एमएमचे आप्त’मधून