“रद्दीवाला…”

Rate this post

 “रद्दीवाला…”

रघु.

रद्दीवाल्या गणूकाकांचा मुलगा.

त्याच्याकडेच निघालोय.

माझ्यापेक्षा दोन एक वर्षांनी लहान असेल.

लकडी पुलापाशी गणूकाकांचं छोटसं खोपट होतं.

गणूकाका शेवटपर्यंत कधी आख्खे दिसलेच नाहीत.

पेपरच्या निगुतीनं बांधलेल्या ढिगार्यामागे, गणूकाकांचा चेहरा तेवढा दिसायचा.

विरळ केस, भिंगेरी चष्मा.

पुढे आलेले दात आणि त्यातून दिसणारं सहजहास्य.

गणूकाकांचा चेहरा अजूनही आठवणींच्या पानात तसाच. 

शेवटी दुकानातच गेले.

गणूकाका आमच्या बाबांचे शाळेपासूनचे मित्र.

परिस्थिती हालाखीची.

शनवारात एक खोलीची जागा.

गणूकाकांचं निम्मं आयुष्य लकडीपुलावरच गेलं असावं.

लहान असताना,रद्दीवाले असं एकदा मी गणूकाकांविषयी बोलल्याचं आठवतंय.

बाबांनी फोडून काढला होता मला.

रद्दीवाले नाही, गणूकाका म्हणायचं. 

बाबांनी बजावलेलं.

जिभेला चांगलं वळण असं सहज (?) लागलेलं.

एकदा बाबांबरोबर मी गणूकाकांकडे गेलेलो.

‘बरा सापडलास. 

हे घे जिम काॅरबेटचं पुस्तक आहे.

कुणी तरी कुणाला तरी प्रेझेंट दिलेलं.

त्या टोणग्यानं हातही लावला नाहीये.

तसंच दिलंय रद्दीत टाकून.’

मी खूष.

तिथल्या तिथं आधीची अर्पणपत्रिका खोडून माझं नाव टाकलं.

भारी वाटलं.

खरं सांगू ,सेकंड हॅन्ड असं काही वाटायचंच नाही तेव्हा.

पुढं पुढं हे रूटीन झालं.

गणूकाकांचं दुकान, हा माझा रविवारचा अड्डा झालेला.

दुकानाबाहेरची खुर्ची माझं समाधीस्थान.

वाट्टेल ते वाचायचो.

चांदोबा, किशोर, चंपक, चाचा चौधरी..

पु.ल., वपु.,देसाई, जी.ए., मिरासदार सगळी मंडळी भेटायची.

नॅशनल जिओग्राफीक, आरडी चे गुळगळीत पानांचे अंक सापडायचे..

कितीही मोठा लेखक असो, कितीही चांगलं साहित्य असो..

रद्दीच्या दुकानाची वारी कुणाला चुकत नाही.

रद्दीच्या दुकानातून जे पुन्हा विकलं जातं, ते अस्सल साहित्य.

साहित्याला खरं देवपण रद्दीच्या दुकानातच येत असावं.

मला अजूनही तसंच वाटतं.

काय सांगत होतो ?

गणूकाकांच्या दुकानात माझ्यासाठी एक खास कप्पा असायचा.

आठवडाभरातली मला आवडणेबल रद्दी, 

गणूकाकांनी तिथं ठेवलेली असायची.

अधाशासारखी मी ती वाचून काढायचो.

फारच आवडलं तर घरी घेवून जायचो.

ऊरलेलं मग फायनली रद्दीत जायचं.

एकदा गणूकाकांकडे वाचत बसलेलो.

” कौत्या, तुझ्या मागच्या वर्षीच्या क्लासच्या वह्या,

आमच्या रघुला देत जा जरा.

जुनी पुस्तकं, गाईड इथनं देतोच मी.

क्लास परवडत नाही रे.

तुझ्या बापूसास बोलू नको हे”

मी बोललोच.

बाबा मला घेऊन गणूकाकांकडे,

” गण्या, माजलास का रे साल्या?

परका झालो का रे मी तुला ?

तुझ्या रघूला टिळक रोडवर, 

कुलकुर्णी क्लासला जायला सांग ऊद्यापासून.

फी भरून आलोय मी त्याची.”

चुगली केल्याचा मनापासून आनंद झाला होता मला.

बहुधा शेवटचाच.

रघू तसा बुद्धीनं यथातथाच.

धंद्यात डोकं भारी चालायचं.

कुठली रद्दी रद्दी आहे,

कुठल्या रद्दीला सेकंडमधे सोन्याचा भाव आहे,

हे त्याला बरोबर कळायचं.

कसाबसा बारावीपर्यंत शिकला.

आन् धंद्याला लागला.

वर्षभरात गणूकाका गेले, 

अन् रघूचा रघूशेट झाला.

तसाच हसमुखराय चेहरा.

गोडबोल्या स्वभाव.

ईलेट्राॅनिक काट्यावर अचूक वजन करायचा.

चोख भाव.

हिशोबाला पक्का.

दुकानाबाहेर वाचणेबल पुस्तकं , मासिकांचं प्रदर्शन.

रद्दीवालं गिर्हाईक बाहेर घुटमळायचंच.

जाताना एखादं पुस्तक घेऊन जायचंच जायचं.

गिर्हाईकांची वाढती मांदीयाळी.

तरीही…

रद्दीच्या दुकानात बसत असला तरीसुद्धा,

रघूचं डोकं भारी चालायचं.

नव्या पिढीतला आळस त्यानं अचूक टिपला.

दोन पोरं हाताशी घेतली.

एक सेकंड हॅन्ड टेम्पो घेतला.

वार लावून एकेक एरिया कव्हर करतो.

सोसायटीच्या चेअरमनशी आधीच बोलून ठेवतो.

नोटीसबोर्डावर, तारीख, वार, वेळ लिहून ठेवतो.

भरभरून रद्दी गोळा करतो.

कड्डक..

जोरात धंदा चालतोय.

दहा पोरं, तीन टेम्पो.

वेबसाईटही काढलीय. 

आॅनलाईन बुकींग घेतो. 

सेकंड पुस्तकांची लिस्ट अपलोड करतो.

भांबुर्ड्यात आठशे स्क्वेअर फूटाचं गोडाऊन आहे.

स्वतःचं.

आता स्वतःचं नवीन अॅपही डेव्हलप करतोय.

आम्ही बसलोयत फक्त दहा ते सहा पाट्या टाकत.

आमच्या डिग्र्यांना रद्दीत सुद्धा भाव मिळत नाही.

आपला माणूस पुढं चालला, की थोडं जेलस फील होतंच.

तरीही, त्याहून जास्त कौतुकच वाटतं.

रघु , आजही मला तितकाच जवळचा आहे.

रद्दी टाकायला मी अजूनही लकडी पुलावर जातो.

माझ्या आवडत्या खुर्चीवर बसून पुस्तकं चाळतो.

फोटोतल्या गणूकाकांना भेटतो.

मजा येते.

आज घरी आलो.

जिन्यावरच तुतारी ऐकू आली.

चिरंजीवांनी भोकाड पसरलेलं.

त्याचं सायन्सची वर्कबुक गायब झालेली.

आख्खं घर ऊलटं करून झटकलं.

नाही म्हणजे नाही सापडलं.

टेक्स्टबुक असतं तर नवीन आणता आलं असतं.

आता ?

चिरंजिवांचा वरचा सा लागलेला.

दारावरची बेल वाजली.

अशा वेळी पाहुणा मनापासून नकोसा वाटतो.

नाईलाजानं दार ऊघडलं.

बाहेर रघुनाथ ऊभे.

सायन्सच्या वर्कबुकसकट.

साक्षात प्रभू रामचंद्र दिसले मला रघुनायकात.

” काय दादा, टाईम्सच्या रद्दीत ही वही टाकली काय ?

मला वाटलंच, मन्याचे वांदे झाले असणार.

मन्नूशेट, हे घ्या तुमचं वर्कबुक.

आणि हे अजून एक सरप्राईझ.

हॅरी पाॅटर बुक आणलंय तुमच्यासाठी.

तसं नवीनच आहे.

वाचा.”

चिरंजीव हॅरी हॅरी करायला लागले.

दुकान बंद करून , घरी जायच्या आधी रघू माझ्याकडे आलेला.

 मस्त गप्पा झाल्या.

रघ्या जेवूनच गेला घरी.

रघू अगदी गणूकाकांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललाय.

फक्त पैशाचं गणित मात्र व्यवस्थित जमवलंय.

चार खोल्यांचा ब्लाॅक आहे एकलव्यपाशी.

गणूकाका असते तर खरंच खूश झाले असते.

माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आठवणीनं आलेला रघू.

पैसे देवून पुस्तक विकत घेतलं.

माझी सही घेतली.

डोळे मिचकावत म्हणाला,

” दादा, पैसे देवून विकत घेतलेलं हे पहिलं पुस्तक.”

नंतर फोनही केला.

पुस्तक आवडलं म्हणाला.

मागच्या रविवारची गोष्ट.

दुपारी शेषाशायी मोडात बिनघोर घोरत होतो.

जाग आली.

डोळे ऊघडले.

पतिव्रतेसारखी ही चहाचा कप घेऊन ऊभी.

माझा प्रशांत दामले झालेला.

” मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं ?”

मी सूरसुरू लागलो.

पुढच्या वाक्यानं स्वर्गातून थेट पुण्यात.

” गिळा लवकर तो. 

ऊगाच गळे काढू नका.

गार होईल तो चहा.”

ही गरम.

एकदम चिरंजीवांची आठवण झाली.

” राजकुमार कुठे आहेत ?”

‘ ते लकडीपुलाशी गेले आहेत.

रघूनायकांच्या सरस्वतीभांडारात, वाचनासाठी.’

मला भरून आलं.

माझी जीन्सची पॅन्ट पोरानं वापरावी तस्सं.

हा वारसा चालवलात चिरंजीव…

आम्ही धन्य झालो.

वाचाल तर वाचाल.

थँक्स रघू.

काल अचानक रघूचा फोन.

” दादा , तुमचं कथुली काल रद्दीत आलं.”

माझा लिखाणाचा भाव एकदम ऊतरला.

आणि चेहराही.

” ऐका तर, पुन्हा लगेच विकलंही गेलं.

70% मधे.”

मी खूष.

क्षणभर वपु झाल्यासारखं ग्रेट वाटलं.

नंतर लगेच जाग आली.

शेवटी रघू म्हणतो तेच खरं.

” आज, आजच्या साठी आनंदानं जगायचं.

ऊद्याची काळजी न करता.

आज संपला, की शेवटी प्रत्येकाच्या नशिबी रद्दीच.”

आज कधी संपणारच नाही,

असा अंधविश्वास बरोबर घेवून मी रघूच्या दुकानी निघालो.

येताय काय?

……कौस्तुभ केळकर नगरवाला.

Leave a Comment